वार्ताहर /रामनगर
गोवा येथून बेंगळूरच्या दिशेने जाणारा केए 22 डी 1544 क्रमांकाचा ट्रक अनमोड घाटात जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली. अनमोड घाटात आरटीओ चेक पोस्टनजीक चढतीला इंजिन गरम होऊन ट्रकने पेठ घेण्यास सुरुवात केली. प्रथम ट्रकचालकाने झाडाच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने मोठा पेट घेतल्याने अग्निशमन दलाला फोन लावण्यात आला. परंतु वाहनाने पेट घेतलेल्या ठिकाणाहून गोवा नजीक असल्याने हा फोन गोवा अग्निशमन दलाला लागला. प्रथम गोवा अग्निशमन दलाचे वाहन यायला निघालेही परंतु, सदर घटना कर्नाटकाच्या हद्दीत घडल्याने, गोवा राज्याच्या नियमानुसार, त्यांना सदर घटनास्थळी येण्याचा परवाना न मिळाल्याने पुन्हा खानापूर येथील अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. परंतु तोपर्यंत वाहन मात्र जळून खाक झाले होते. खानापूर येथील अग्निशमक दलाचे वाहन पहाटे 4 वाजता येऊन पोहोचले. सदर वाहन लोंढा येथील अल्ताफ बंकापुरे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.









