वृत्तसंस्था/ काबुल
अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी यापूर्वी जोनाथन ट्रॉटची नियुक्ती करण्यात आली होती. अफगाण क्रिकेट मंडळाने ट्रॉट बरोबरच्या करारात वाढ केली असून आता तो 2024 अखेरपर्यंत अफगाण संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहिल.
2022 च्या जुलैमध्ये अफगाण संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला अफगाण क्रिकेट मंडळाने ट्रॉट बरोबर 18 महिन्यांचा करार केला होता. या कराराची मुदत 2023 अखेरीस संपल्याने त्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अफगाणचा क्रिकेट संघ जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि अफगाण यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाण संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक चांगली झाली होती. त्यांनी पाकिस्तान, इंग्लंड, लंका आणि नेदरलँड्स या संघांचा पराभव केला होता.









