वृत्तसंस्था/हांगझोयु (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व टूर फायनल्स स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारतीय जोडीने महिला दुहेरीत आपला पहिला विजय नोंदवून उपांत्य फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील ही शेवटची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या शेवटच्या स्पर्धेसाठी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद ही एकमेव भारतीय जोडी पात्र ठरली आहे. महिला दुहेरीच्या सामन्यात त्रिशा आणि गायत्री यांनी मलेशियाच्या पर्ली टॅन आणि टी. मुरलीधरन यांचा 21-19, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये 46 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. त्रिशा आणि गायत्री यांना आपल्या गटातील सलामीच्या सामन्यात चीनच्या टॉपसिडेड लियु शू आणि टॅन निंग यांच्याकडून 20-22, 22-20, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला होता. चीनच्या शू आणि निंग या टॉपसिडेड जोडीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते. या विजयामुळे त्रिशा आणि गायत्री यांनी उपांत्य फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत राखले आहे.









