वृत्तसंस्था / बेसील (स्वीस)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. शनिवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या लियु शू आणि तेन निंग यांनी त्रिशा आणि गायत्री यांचा 15-21, 21-15, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना दीड तास चालला होता. या लढतीत त्रिशा आणि गायत्री यांनी पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. पण त्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये चीनच्या जोडीने दर्जेदार खेळ केल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेत पुरुष एकेरीत फ्रान्सच्या पोपोव्हने भारताच्या शंकर सुब्रमणीयनचा 21-10, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव केल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.









