वृत्तसंस्था/ हाँगकाँग
येथे सुरू असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. मात्र चिराग सेन व मनाव चौधरी यांना एकेरीमध्ये पराभव पत्करावा लागला.
त्रीसा-गायत्री यांनी युक्रेनच्या पोलिना बुहरोव्हा व येवहेनीया कांतेमीर यांना पहिल्या फेरीत 21-14, 21-13 असे हरवित उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्यांची पुढील लढत ऑलिम्पिक रौप्यविजेत्या चीनच्या लियु शेंगशू व तान निंग यांच्याशी होणार आहे. रुतुपर्णा पांडा व स्वेतपर्णा पांडा या भारतीय जोडीला चिनी तैपेईच्या हसीह पेइ शान व हंग एन त्झू यांच्याकडून 11-21, 8-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष एकेरीत चिराग सेन व मानव चौधरी यांना पात्रता फेरीतच पराभूत व्हावे लागले. चिरागने पहिल्या सामन्यात कॅनडाच्या लाय यिन चुंगवर विजय मिळविला. मात्र दुसऱ्या सामन्यात कॅनडाच्या झियावडाँग शेंगने त्याला चुरशीच्या लढतीत पराभूत केले. मानवनेही युक्रेनच्या ओलेक्सी तितोव्हवर विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला चॅन यिन चॅककडून पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीतही वैभव व आशित सूर्या या भारतीय जोडीला पात्रता फेरीत पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली.









