वृत्तसंस्था/ दुबई
बुधवारपासून येथे सुरू झालेल्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले असले तरी त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी शानदार विजय मिळवित महिला दुहेरीची तर मिश्र दुहेरीत एन. सिक्की रेड्डी-रोहन कपूर व अश्विनी पोन्नप्पा-बी. सुमीत रेड्डी यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
राष्ट्रकुलमध्ये महिला दुहेरीचे कांस्य मिळविलेल्या त्रीसा-गायत्री यांनी पिछाडी भरून काढत इंडोनेशियाच्या लॅनी ट्रिया मायासरी व रिब्का सुगियार्तो यांच्यावर 17-21, 21-17, 21-18 अशी मात केली. एक तासाहून अधिक काळ ही लढत रंगली होती. मिश्र दुहेरीची जोडी रोहन कपूर व एन. सिक्की रेड्डी यांनीही तिसरा सामना जिंकत शेवटच्या 32 फेरीत स्थान मिळविले असून त्यांनी मलेशियाच्या चॅन पेंग सून व चीयाह यी सी यांचा 21-12, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी फिलिपिन्सच्या अल्विन मोरादा व अॅलीसा यिसाबेल लिओनार्दो यांचा 21-17, 25-23 असा तर पहिल्या फेरीत यूएईच्या जोडीचा पराभव केला होता. मिश्र दुहेरीची आणखी एक जोडी अश्विनी पोन्नप्पा व बी. सुमीत रे•ाr यांनी शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविताना 20 व्या मानांकित हाँगकाँगच्या टँग चुन मॅन व त्से यिंग सुएत यांच्यावर 21-16, 21-17 असा विजय मिळविला. महिला दुहेरीची जोडी सिमरन सिंघी व रितिका ठाकर यांना मात्र गट फेरी पार करता आली नाही.
सेनला धक्का
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या लक्ष्य सेनने काही अवधीच्या ब्रेकनंतर पुनरागमन केले. मात्र त्याला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक सातव्या मानांकित सिंगापूरच्या लोह कीन यू याने त्याचा 21-7, 23-21 असा पराभव केला. महिला एकेरीत मालविका बनसोडलाही पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या अकाने यामागुचीने तिला 25-23, 21-19 असे हरविले. आकर्षी कश्यपलाही पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या कोमांग अयु काह्या देवीकडून 21-6, 21-12 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत व्हीएस रविकृष्णा व शंकर प्रसाद यांना मलेशियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत अश्विनी भट व शिखा गौतम यांनी शेवटच्या 32 फेरीत स्थान मिळविताना इंडोनेशियाच्या मेलीसा ट्रायस पुस्पितासरी व रॅशेल अॅलेसीया यांच्यावर 22-20, 12-21, 18-21 अशी मात केली.









