प्रतिनिधी/ पणजी
कला संस्कृती खात्यातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सांखळी येथील प्रसिद्ध त्रिपुरारी पौर्णिमा राज्योत्सव उद्या दि. 7 रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त वैशिष्टय़पूर्ण अशा नौकानयन स्पर्धेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विठ्ठलापूर सांखळी येथे वाळवंटी नदीच्या किनारी सायं. 7 वाजता होणाऱया या महोत्सवास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री गोविंद गावडे, रोहन खंवटे, आमदार प्रेमेंद्र शेट, गणेश गावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे हस्तकारागिरीतून बनविलेल्या अत्यंत सुबक वैशिष्टय़पूर्ण नौका. या बोटी म्हणजे आकाशकंदीलाचेच स्वरूप असते. रात्रीच्या अंधारात पाण्यात तरंगणाऱया त्या नौका पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. अशा किमान 50 नौका पाण्यात सोडण्यात येतात. रात्री 10.30 ते 12 पर्यंत ही स्पर्धा चालते.
तत्पूर्वी 7 वाजता श्रीराधाकृष्णाची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर वाळवंटी नदीत ‘दीपदान’ अर्थात नदी पात्रात पारंपरिक दीप सोडण्याचा कार्यक्रम होईल. 7.30 वाजता ‘रसिकरंजन गीत नृत्य आविष्कार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. त्यानंतर 10.30 वाजता श्रीविठ्ठल रखुमाई मंदिरातून पालखी मिरवणूक निघेल. 11 वाजता त्रिपुरासूर वध होईल. त्यानंतर ‘सरंगा’ महोत्सव होईल. ‘हॉट एअर बलून’ प्रमाणे तयार करण्यात आलेले मोठय़ा आकाराचे असंख्य कंदील आकाशात सोडण्यात येतात. त्यांच्या जोडीला दारुकामाची आतषबाजीही करण्यात येऊन महोत्सवाची सांगता होते.
नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना 35 हजार रुपयांचे पहिले बक्षीस. 30 हजारांचे दुसरे, 25 हजारांचे तिसरे, 20 हजारांचे चौथे आणि 15 हजारांचे पाचवे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येकी 8 हजारांची पाच बक्षिसे, दहा निवडक स्पर्धकांना मानधन स्वरुपी प्रत्येकी 5 हजार रुपये आणि उर्वरित स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल प्रत्येकी 4 हजार रुपये देण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
दरम्यान, गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ात महत्वपूर्ण योगदान आणि प्राणांचे बलिदान देणाऱया स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शनही या महोत्सवस्थळी आयोजित करण्यात येणार आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीविठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हे प्रदर्शन होणार असून सर्वांनी त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन खात्याकडून करण्यात आले आहे.









