वृत्तसंस्था / आगरतळा
ईशान्य भारतातील राज्य त्रिपुरा येथे येत्या 3 सप्टेंबरला दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्रिपुरा आणि बांगला देश यांच्यातील सीमा बंद करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. राज्याच्या बोक्सानगर आणि धनपूर या मतदारसंघांमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. सीमारेषा सकाळी 3 सप्टेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून 5 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
त्रिपुरामध्ये या पोटनिवडणुकांना महत्व देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने काही महिन्यांपूर्वी येथे सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळविले आहे. या निवडणुका त्या पक्षाच्या दृष्टीने आपले बहुमत वाढविण्यासाठी महत्वाच्या आहेत. तर विरोधी पक्षांच्या ऐक्याचीही येथे कसोटी लागणार आहे. बोक्सनगर मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शमसुल हक यांचा मृत्यू झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर धनपूर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार प्रतिमा भौमिक यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. त्रिपुरा राज्याच्या स्थापनेपासून धनपूरच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कधीही पराभव झाला नव्हता. मात्र, मागच्या निवडणुकीत भौमिक यांनी हा मतदारसंघ जिंकून डाव्यांची विजयमालिका खंडीत केली होती.









