सावंतवाडी । प्रतिनिधी
युरेका सायन्स कणकवली, व विद्यानिकेतन कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश दर्शन जिल्हास्तरीय स्पर्धेत कळसुलकर हायस्कूलच्या निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. तृप्ती नकुल पार्सेकर यानी तृतीय क्रमांक पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
कोकणातील उपलब्ध नैसर्गिक वस्तू झाडे, पाने, फुले, झावळ्या इ. चा वापर करून पर्यावरण पुरक देखावे केलेल्या जिल्ह्यातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये सौ. पार्सेकर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
परीक्षकांनी परीक्षणासाठी जे निकष लावलेले होते त्यामध्ये मुर्तीची प्रमाणबद्धता, रंगसंगती व त्या अनुषंगाने केलेली पर्यावरण पुरक आरास याचा विचार करून परिक्षण केले. परिक्षक म्हणून कवी , लेखक, अनुवादक, पञकार, चिञकार तसेच सतत तेहतीस वर्षे लोकसत्ता, लोकमत, नवशक्ती, पुण्यनगरी अशा वृत्तपत्रात काम केलेले तसेच सह्याद्री वाहिनीच्या वतीने विविध स्पर्धांचे परिक्षण केलेले श्री शिवाजी गावडे व बेंगलोर स्थित राष्ट्रीय किर्तीचे चिञकार श्री प्रकाश कबरे यांनी काम पाहिले. सौ. पार्सेकर यांना बागबगीच्या, परसबाग तसेच टाकावू पासून टिकाऊ देखण्या वस्तू करण्याचा छंद असून झाडाफुलांपासून त्या अनेक वस्तू बनवतात.









