काय ती थरारकता! काय ते हृदयाचे ठोके वाढवणारे चेंडू! सर्व कसं अविश्वसनीय! आणि हे सर्व घडलं ते दोन्ही संघात स्टार यार कलाकार नसताना. मागील पंचवीस वर्षे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळून बघतोय. कधी आकाशवाणीच्या समालोचन कक्षातून तर कधी मैदानातून तर कधी दूरदर्शनवरून. त्यावर विश्लेषणही करतोय. परंतु आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो. सर्व सुख पैशाने विकत घेता येत नाही हेच खरं. काही सुखं बघून, अनुभवून मिळू शकतात हे काल क्रिकेटने सिद्ध केलं. तेही क्रिकेटचा आत्मा असणाऱ्या कसोटीमध्ये. आणि हो, हे सर्व घडलं ते क्रिकेट या खेळाला जन्म दिलेल्या इंग्लंड भूमीत. जो सामना भारतीय संघाने हमखास जिंकला पाहिजे तिथेच भारतीय संघ नेमका तोंडघशी पडतो. अगदी जावेद मियांदादच्या त्या षटकारापासून ते कालच्या कसोटी सामन्याअगोदरपर्यंत. असे बरेच सामने आहेत जिथे विजय दृष्टिक्षेपात असताना भारतीय संघाने समोरच्या संघाला विजय ‘स्वाहा’ केलाय. परंतु कालचा सामना त्याला अपवाद निश्चित होता. मी मागच्याही लेखात म्हटलं होतं की भारतीय संघाने एकदा जरी इंग्लंडचे 20 गडी बाद केले असतील, तरी ती धार भारतीय संघाच्या गोलंदाजीत या पूर्ण मालिकेत निश्चित नव्हती. सिराज वगळता या मालिकेत कुठल्याच गोलंदाजाने धारधार गोलंदाजी केली नाही. थोड्याफार प्रमाणात कृष्णा ‘प्रसिद्ध’ही झाला. सिराजसाठी कालच्या सामन्यातील पाचव्या दिवसातील पहिलं आणि शेवटचे सत्र त्याच्यासाठी एक ‘मैलाचा दगड’ होता. जसप्रीत बुमराह पाचपैकी फक्त तीनच कसोटी खेळणार, हे अगोदर जाहीर करून नवख्या शुभमन गिलला खऱ्या अर्थाने अडचणीत आणलं. परंतु पूर्ण मालिकेत सिराजने ‘मै हू ना’ असं म्हणत खऱ्या अर्थाने शुभमन गिलला धीर दिला. जर तुम्ही पाचपैकी फक्त तीनच कसोटी सामने खेळत असाल तर तुम्ही 14 च्या चमूत का आहात, हा प्रश्न मात्र बुमराहच्या बाबतीत अनुत्तरीत राहतो.
जिथे विराट, रोहित आणि अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून आकस्मिक एक्झिट घेतल्यानंतर खरा सहारा होता तो बुमराहचा. परंतु या मालिकेत एक कसोटी वगळता त्याची गोलंदाजी थोडीशी अशक्तच वाटली. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात ‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ म्हणत कधी विजय यजमान यांच्या पारड्यात तर कधी भारतीय संघाच्या तराजूत दिसला. परंतु सरते शेवटी भारतीय संघाने या मालिकेचे नामकरण केलं. चौथ्या दिवशी चहापानापर्यंत यजमान इंग्लंड संघ 3-1 ने मालिका सहज जिंकणार असंच चित्र होतं. परंतु हे क्रिकेट आहे तेही कसोटी क्रिकेट, त्यांनी आपला रंग दाखवला. भलेही क्रिकेटच्या भाषेत कसोटी क्रिकेटचा ‘रबर’ भारतीय संघाकडे राहिला नसेल परंतु हा भारतीय संघाचा विजय पुढील एक तप तरी इंग्लंडचे क्रिकेटशौकीन विसरणार नाहीत, एवढं मात्र खरं!
कधी नव्हे तो पाचव्या सामन्यात इंग्लंडचा संघ पूर्णत: दुबळा होता. इंग्लंडचा हुकमी एक्का बेन स्टोक्स जो पूर्ण मालिकेत तुरुपचा एक्का ठरला होता, तो या सामन्यात नव्हता. त्यातच चालू सामन्यात ख्रिस वोक्सच्या दुखापतीने त्यांची बाजू पूर्णत: लंगडी झाली होती. परंतु हा पठ्ठ्या हात फ्रॅक्चर असताना सुद्धा मैदानात आला. भलेही इंग्लंडचा पराभव झाला असेल. परंतु ख्रिस वोक्स आला, त्याने पाहिलं आणि त्याने सर्वांना जिंकूनही घेतलं. दुसरीकडे जो रूटसारख्या खेळाडूने व्यावसायिक क्रिकेट काय असतं हे साऱ्या जगाला दाखवून दिलं. भारतीय क्रिकेटमध्ये एकदा का तुम्हाला कसोटी क्रिकेटची कॅप तुमच्या डोक्यावर आली की तुम्ही ताबडतोब रणजी क्रिकेट विसरता. इंग्लंडमध्ये याविरुद्ध आहे. काऊंटी क्रिकेटच त्यांच्या क्रिकेटचा आत्मा आहे.
दुसरीकडे या मालिकेत भारतीय संघ पूर्णत: अनुभवी नव्हता. जास्तीत जास्त प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होईल ही अपेक्षा या मालिकेत होती. परंतु या सर्व गोष्टींना छेद देत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. शेवटी क्रिकेटमध्ये नशिबाला महत्त्व आहे. जो शुभमन गिल मागील सहा महिन्यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या 11 खेळाडूंमध्ये बसेल की नाही, ही शंका होती. परंतु काळाचा महिमा बघा, रोहित, विराट, अश्विनची अचानक एक्झिट शुभमन गिलच्या पथ्यावर पडली. आणि बघता बघता सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल मागे राहिला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाला त्यांच्या नावा अगोदर ‘सर’ हा शब्द का संबोधला जातो, हे त्याने पूर्ण मालिकेत सिद्ध केलं. मालिकेत भारतीय संघाची निवड थोडी वेगळी असती तर कदाचित पूर्ण मालिकेचा निकाल वेगळा दिसला असता. परंतु या जर तरच्या गोष्टी. गंमत बघा, मागच्या कसोटीत सामना अनिर्णात राखून भारताने एक प्रकारे विजय मिळवला होता. आणि या पाच कसोटीच्या शेवटच्या सामन्यात भारताने नेत्रदीपक विजय मिळवत जरी बरोबरी साधली असेल तरीही मालिका भारतानेच जिंकली, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. हा लेख लिहिता लिहिता माझे परममित्र गजाभाऊ यांचा फोन आला. मी त्यांना मुंबईच्या भाषेत म्हटलं, आता कसं वाटतंय गार गार वाटतंय. हे ऐकून त्यांनी माझा फोन कट केला. असो. शेवटी या मालिकेच्या अनुषंगाने मी जाता जाता एवढेच म्हणेन की शेवटी कसोटी क्रिकेटच जिंकलं. पुन्हा एकदा भारतीय संघाचं त्रिवार अभिनंदन!!!
— कव्हर ड्राईव्ह
विजय बागायतकर









