सौंदत्ती पोलिसांची कारवाई, 8 दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकली चोरणाऱया एका त्रिकुटाला अटक करून त्यांच्याजवळून 4 लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सौंदत्ती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी ही माहिती दिली आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. आय. नडविनमनी, उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
दिलावरसाब हासनसाब नदाफ, फकिराप्पा दुर्गाप्पा गट्टी, सिद्धराम सिद्धाप्पा चिरमुरी (तिघेही रा. चुंचनूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. या त्रिकुटाने सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 व कटकोळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 5 अशा एकूण 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.









