डॉक्टरांना धडा शिकविण्यास दोन मिनिटे लागणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
आरजी कर महाविद्यालयील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार तसेच तिच्या हत्या प्रकरणामुळे बंगालमध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेकदा डॉक्टरांची भेट घेत संप संपुष्टात आणण्याचे आवाहन केले आहे. याचदरम्यान तृणमुल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांनी या ज्युनियर डॉक्टरांना धमकी देत पुन्हा वाद निर्माण केला आहे.
बरहामपूरमध्ये मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे ज्युनियर डॉक्टर अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने यावर संताप व्यक्त करत वातानुकुलित खोल्यांमध्ये आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त होत असल्याचे म्हटले आहे.
हे लोक डॉक्टर म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे आहेत का? या डॉक्टरांना कामावर परत आणण्यास मला केवळ दोन मिनिटे लागतील अशी धमकी तृणमूल आमदाराने दिली आहे. हुमायूं कबीरने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ज्युनियर डॉक्टरांचा उल्लेख केला. परंतु त्यांनी ही टिप्पणी ज्युनियर डॉक्टरांच्या सोमवारी दुपारपासून काम बंद करण्याच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
भाजपकडून तृणमूल लक्ष्य
तृणमूल नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे स्थिती आणखी बिघडत आहे. पूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडण्याच्या वाटेवर आहे. रुग्णांच्या मृत्यूवर त्यांचे कुटुंबीय खराब आरोग्य सुविधांना जबाबदार ठरवत आहेत. तर ज्युनियर डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये असुरक्षित वाटत आहे. हे डॉक्टर स्वत:च्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर उतरले आहेत असे म्हणत भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे.









