ईडीकडून कारवाई : पशू तस्करीप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
ईडीने पश्चिम बंगालमध्ये होत असलल्या सीमापार पशू तस्करी रॅकेटप्रकरणी सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासांतर्गत तृणमूल काँग्रेसचे नेत अनुव्रत मंडल यांचे बँक खात्यांमधील 26 कोटी रुपये जप्त केले आहेत. अनुव्रत मंडल यांना ईडीने नोव्हेंबर 2022 मदये अटक केली होती. तर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
पीएमएलए अंतर्गत अनुव्रत मंडल विरोधात बँक खात्यातील 25.86 कोटी रुपये जप्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. ही रक्कम 36 बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती अशी माहिती ईडीने दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पशू तस्करीला संरक्षण प्रदान करत अनुव्रत मंडलने 48.06 कोटी रुपयांचे गुन्हेगारी उत्पन्न प्राप्त केले होते.
गुन्ह्यावेळी मंडल हे तृणमूलचे वीरभूम जिल्हा अध्यक्ष होते आणि बीरभूम आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनावर त्यांचे नियंत्रण होते. स्वत:चा अंगरक्षक सहगल हुसैनच्या माध्यमातून अनुव्रत मंडल हे पशू तस्करीचा म्होरक्या मोहम्मद इनामुल हकसोबत सातत्याने संपर्कात होते. अनुव्रत मंडलने मोहम्मद इनामुल हककडून प्राप्त रक्कम स्वत:चे कुटुंबीय, संबंधित संस्था आणि बीरभुमच्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या अनेक बँक खात्यांमध्ये जमा केली होती. ईडीने याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपपत्रं दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा तपास सीबीआयकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यावर सुरू झाला होता. पशू तस्करीचे रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली माजी बीएसएफ कमांडेंट सतीश कुमार, मोहम्मद इनामुल हक आणि इतर काही जणांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला होता.









