नादिया जिल्ह्य़ात घडला गुन्हा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्हय़ात तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली आहे. नादिया जिल्हय़ातील चौपरिया गावात हा गुन्हा घडला असून मारले गेलेल्या नेत्याचे नाव आमोद अली बिस्वास आहे. आमोद अली हे बाजारपेठेत खरेदी करत असताना गुंडांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या आहेत. गुंडांनी स्वतःचे चेहरे झाकलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हत्येची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात तपास सुरू केला आहे. या हत्येमागे राजकीय कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तृणमूल नेत्याच्या हत्येमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आमोद यांच्या मारेकऱयांना सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा होणार. पंचायत निवडणूक नजीक आल्याने विरोधी पक्ष प्रक्षोभक विधाने करत असून भाडोत्री मारेकऱयांची मदत घेतली जात आहे. पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. बंगालला अशांत करू पाहणाऱयांना जनताच धडा शिकविणार असल्याचे विधान तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांनी केले आहे.









