‘तरुण भारत’च्या वृत्तांनंतर हडकंप, कारवाईसाठी पोलीस धजावणार कधी
प्रतिनिधी/ गोडोली
ऐतिहासिक साताऱयाच्या प्रवेशद्वारातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात परेश, रामा, शरद या त्रिकुटाचे मटका, जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. रोज लाखोंची उलाढाल होणाऱया या अड्डय़ावर पोलिसांची कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. या अड्डय़ावर ‘तरुण भारत’ टीमने स्पॉटवर जाऊन पैशाच्या राशी, चिठ्ठय़ा गोळा करणारे बुकी, मटका जुगार खेळण्यासाठी झालेली गर्दीचे फोटो काढले. यावेळी त्रिदेवांनी थेट पोलीस अधीक्षकांना खुले आव्हान देण्याची भाषा वापरली. शासकिय जागेवर अतिक्रमण करून सुरू असलेल्या या अड्डय़ाचा पोलखोल करणारी बुधवार दि. 18 जानेवारी रोजी बातमी प्रसिद्ध झाली की मोबाईल स्वीच ऑफ करून गायब झाले. मात्र पोलीसांनी याची दखल न घेतल्याने अड्डय़ावर बुकी चिठ्ठय़ा गोळा करत आहेत. यावरुन या त्रिदेवांची दहशत की यामागे बडय़ा हस्तीचा दबाव हे स्पष्ट झाले नाही.
साताऱयात खुलेआम गुटखा विक्री, मटका, जुगार अड्डे कायम सुरू असतात. हजारोंच्या कौटुंबिक सुखाची होळी करणाऱया मटका, जुगार अड्डय़ावर किरकोळ कारवाई केली जाते. ठोस कारवाई करुन ते कायमचेच बंद केले जात नाहीत. इथं कायदाच कमी पडतो की आर्थिक हितसंबंध घट्ट झाल्यामुळे कारवाई होत नाही, याचा उलगडा आजवर झाला नाही.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात परेश, रामा, शरद या त्रिकुटाचे मटका, जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. रोज लाखोंची उलाढाल होणाऱया या अड्डय़ावर तरुण भारत टीमने स्पॉटवर जाऊन पाहणी केली असता बुकी, गर्दी, त्रिकुटाची अरेरावी भाषा, दमबाजी, दहशत आणि पैशाच्या जोरावर कारवाई होऊ नये, यासाठी कायपण करण्याची तयारी थक्क करणारी दिसली.
याचा फोटोसह सडेतोड सविस्तर बातमी ‘तरुण भारत’मध्ये बुधवार दि. 18 रोजी प्रसिद्ध झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. बातमी वाचून त्रिदेवांनी मोबाईल स्वीच ऑफ केले मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. यावरुन ’डाल में कुछ काला धन है,’ हा संशय बळावतो आहे.
यापूर्वी ही तरुण भारतने खुलेआम गुटखा विक्री, मटका जुगार अड्डे बंद होण्यासाठी आवाज उठवला. तेवढय़ापुर्ती किरकोळ कारवाई करत परफेक्ट नाटक वठवली जाते.
‘तरुण भारत’कडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील आता त्रिकुटाचे मटका, जुगार अड्डे बंद होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. खेड ग्रामपंचायत हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी आवाज उठवा, आम्ही सर्व माहिती देतो, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधून सांगितले.








