जनतेला केले अनुकरणाचे आवाहन ः
@ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी स्वतःच्या सोशल मीडिया अकौंट्सवर डिस्प्ले पिक्चर (डीपी) म्हणून राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावला आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व नागरिकांना याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा तसेच अन्य वरिष्ठ भाजप नेत्यांनी स्वतःचा डीपी बदलत तिरंगा लावला आहे.
पंतप्रधानांनी देशवासीयांना 2-15 ऑगस्टदरम्यान सोशल मीडियावर तिरंग्याला स्वतःचे प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरत ‘हर घर तिरंगा’ला एक जन आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आमच्या देशातील प्रत्येक घर तिरंग्यासाठी तयार आहे. मी स्वतःच्या सोशल मीडिया पेजेसवरील डीपी बदलला असून तुम्ही सर्वांनी याचे अनुकरण करावे अशी विनंती आहे’’ असे पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.
पिंगली वेंकय्या यांचे स्मरण
पंतप्रधानांनी यावेळी पिंगळी वेंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. पिंगली वेंकय्या यांनीच राष्ट्रीय ध्वज साकारला होता. महान पिंगली वेंकय्या यांचा देश नेहमीच ऋणी राहणार आहे. तिरंग्यापासून शक्ती आणि प्रेरणा घेत आम्ही राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करत राहू असे मोदींनी म्हटले आहे.









