वृत्तसंस्था/ लखनौ
भारताचे माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे 23 ऑक्टोबर रोजी निधन झाले. भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये बेदी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. दिवंगत बेदी यांना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आदरांजली वाहिली.
लखनौमध्ये रविवारी झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी दंडाला काळ्या फिती बांधून प्रवेश करत बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहिली. बेदी यांचे गेल्या सोमवारी दीर्घकालीन आजाराने वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले होते. बेदी यांनी 1976 ते 1978 या दोन वर्षांच्या कालावधीत भारताचे नेतृत्व 22 कसोटीत केले होते. त्यांनी 1967 ते 1979 या कालावधीत 67 कसोटी आणि 10 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 28.71 धावांच्या सरासरीने 266 गडी बाद केले आहेत.









