वायनाडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधींचे वक्तव्य : आदिवासी देशाचे खरे मालक :
वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाड येथील डॉ. आंबेडकर डिस्ट्रिक्ट मेमोरियल कॅन्सर सेंटरमधील ऊर्जा सुविधेचे रविवारी उद्घाटन केले आहे. या सुविधेकरता त्यांनी खासदार निधीमधून 50 लाख रुपये प्रदान केले होते. यावेळी बोलताना राहुल यांनी देशात सध्या दोन विचारसरणींदरम्यान संघर्ष सुरू असल्याचे म्हटले. आदिवासी हेच देशाचे खरे मालक असल्याचे आम्ही मानतो, तर दुसरी विचारसरणी मात्र त्यांना आदिवासी ऐवजी वनवासी म्हणून संबोधित आहे. या दुसऱ्या विचारसरणीचे लोक आदिवासींना देशाचे खरे मालक मानत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानात झालेल्या बैठकीत आदिवासी समुदायासोबत चर्चा केली होती. त्यांच्याशी मी दोन विचारसरणींसंबंधी बोललो होतो. या दोन्ही विचारसरणी सध्या देशात परस्परांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. आदिवासीचा अर्थ जमिनीचा खरा मालक असा होतो. आदिवासीचा अर्थ या पृथ्वीसंबंधी एक समज असा होतो. ज्या ग्रहावर आम्ही राहतो, त्याच्यासोबत एक विशेष नाते. आमचे आदिवासी बंधू भगिनी या देशाचे खरे मालक आहेत. आदिवासींना जमीन अन् जंगलांवर अधिकार मिळायला हवेत असे आमचे मानणे असल्याचे राहुल म्हणाले.
मोदी राष्ट्रवादी नाहीत
काँग्रेस नेत्याने शनिवारी वायनाडच्या कलपेट्टा येथे एक जाहीर सभा घेतली होती. यादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी नसल्याची टीका केली होती. संसदेत मणिपूर मुद्द्यावर बोलत असताना ते हसत होते. भाजपने मणिपूरमध्ये आयडिया ऑफ इंडियाची हत्या केली आहे. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आल्याचे मी संसदेत म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी संसदेत 2 तास 37 मिनिटांचे भाषण केले, परंतु भारमातेच्या हत्येवर दोन मिनिटेही बोलले नाहीत. पंतप्रधान मोदींना चार महिन्यांपासून मणिपूरला जाण्याचे धाडस झाले नाही. कारण ते राष्ट्रवादी नाहीत. आयडिया ऑफ इंडियाची हत्या करणारे राष्ट्रवादी असूच शकत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.









