शासनाकडून मिळाली ७० कोटींची आर्डर : कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांची माहिती
वारणानगर / प्रतिनिधी
वारणा दूध उत्पादक प्रक्रिया संघाला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आदिवासी ८२ शाळांना २०० मिली टेट्रा पॅक मधून सुगंधी दूध पुरवणे ची सुमारे ७० कोटीची आर्डर मिळाली असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. टेट्रापॅक मधील सुगंधी दूधाचा पुरवठा होणाऱ्या पहिल्या टँकरचे पूजन संघाचे उपाध्यक्ष एच्. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, आर. व्ही.देसाई,अधिक पाटील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दूध सुगंधी पुरवठा ऑर्डर बद्दल माहिती देताना कार्यकारी संचालक मोहन येडूरकर म्हणाले टेट्रा पॅक मधून सुगंधी दूध पुरवणे बाबतची ई-निविदा संघाने भरली होती महाराष्ट्र शासनाकडून त्यास मंजूरी मिळाली असून आदिवासी विकास आयुक्तालय यांचे अंतर्गत येणाऱ्या सुमारे ८२ आदिवासी शाळांना सुगंधी दूध पुरवठा संघाकडून करणेत येणार आहे या आर्डर मुळे संघाकडून अधिकचे दूधाची निर्गत करता येणार आहे. बटर व दूध पावडर दराच्या चढ – उतारामुळे दूध उद्योगात तोटा सहन करावा लागतो अशा वेळी दूध पुरवठा करणे अधिक सोईचे व फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले.
संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांचे यशस्वी मार्गदर्शनाखाली संघाने यापूर्वी बिहार राज्याला मिक्स मिल्क कॉन्सट्रेंट दूधाचा यशस्वी पुरवठा केला आहे तसेच देशातील इतर राज्यांना ही दूध व दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करणेत येत आहे.देशाच्या संरक्षण दलास ही संघाकडून तूप,दूध पावडर, टेट्रा पॅक मधील दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे असे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यानी सांगितले.









