खुनाचा गुन्हा दाखल; शेड्याळ येथील घटना, पाच जणांना अटक
जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील शेड्याळ येथे दारूची बाटली न दिल्याने गावातीलच दहा जणांच्या जमावाने एका समाजाच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल रमेश चव्हाण (वय २७) गंभीर जखमी झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती. जखमी बादलवर सांगली येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बादल चव्हाण यांचे निधन झाले आहे. याप्रकरणी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यावरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेने गावातील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणास्तव तहसीलदार जीवन बनसोडे यांनी जत तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या घटनेने घटनास्थळी व जतमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जत उपविभागीय पोलीस कार्यालयास भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आहे. सदरच्या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी
दारूची बाटली दे म्हणून सागर चव्हाण यांच्या घरावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील दहा जणांनी दगडफेक केली होती. घरातील फ्रीज, टीव्ही व घराबाहेर लावलेल्या दोन मोटारसायकली जाळल्या होत्या. घरातील बादल रमेश चव्हाण, सागर रमेश चव्हाण, आकाश रमेश चव्हाण यांना जबर मारहाण करण्यात आली होती. सागर व आकाश हे पळून गेल्याने बचावले. जमावाच्या ताब्यात सापडलेल्या बादल चव्हाण यास शेड्याळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. जखमी बादल वर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पोलिसांनी माजी सरपंच अशोक पाटील, चंदू गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चंदू गुगवाड व सुरेश देवर्षी, सुरेश हावगोंडी या तिघांना अटक केले होते. अनोळखी म्हणून उल्लेख असलेल्या संशयित आरोपी नितीन नरूटे, नागेश श्रीशैल गुगवाड या दोघांना पोलिसांनी अटक करून खातरजमा करून गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित आरोपी म्हणून असलेले मास्तर तेली, आशोक पाटील हे अद्याप फरार आहेत.
रविवारी पहाटे जखमी बादलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूनंतर रविवारी दुपारी पूर्वी गुन्हा दाखल असलेल्या दहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले करत असून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिक खबरदारी घेतली आहे. तसेच 250 कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे.
तर रविवारी आदिवासी पारधी समाजाचे नेते सुनील काळे, नामदेव काळे, बसवराज चव्हाण, राहुल काळे, गोरख काळे, सागर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जत उप विभगीय कार्यालय येथे मोर्चा काढला होता. सुरवातीस समाजाने मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला. पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.