वृत्तसंस्था/ पॅरिस
सीन नदीतील पाण्याच्या दर्जाबद्दलच्या चिंतेमुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना पुऊषांचा ट्रायथ्लॉन प्रकार मंगळवारी पुढे ढकलावा लागला. सीन नदी खूप प्रदूषित झालेली असून त्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे. नदीच्या सफाईची अत्यंत महाग प्रक्रिया आटोपल्यानंतर शर्यतीचा पोहण्याचा भाग लगेच मार्गी लागू शकेल, अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.
बुधवारी पुऊषांची ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आयोजकांनी सांगितले. त्या दिवशी महिलांची स्पर्धा देखील व्हायची आहे. परंतु पाण्याच्या चाचण्यांनी नदीतील ‘ई-कोली’ आणि इतर जीवाणूंची पातळी स्वीकारार्ह आहे असे दर्शविल्यासच दोन्ही स्पर्धा पुढे जातील. शुक्रवारचा दिवस हा राखीव म्हणून ठेवण्यात आला आहे.
तथापि, गुरुवारपर्यंत वादळ येण्याचा किंवा पाऊस पडण्याचा अंदाज असून यामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकाची फेररचना करण्याच्या प्रयत्नांत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कारण पावसामुळे सीनमध्ये सामान्यत: जीवाणूंची पातळी वाढते. पॅरिसमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात मुसळधार पाऊस पडला होता. पाऊस शनिवारीही कायम होता. ट्रायथलीट्सना नदीतील मार्गाची ओळख करून देण्यासाठी आखलेला सराव कार्यक्रमाचा भागही रविवारी आणि सोमवारी या दोन्ही दिवशी रद्द करावा लागला.
आमच्या नियंत्रणाबाहेरील हवामानविषयक घटना दुर्दैवी आहेत, असे ऑरेली मर्ले या पॅरिस 2024 च्या क्रीडा संचालकांनी सांगितले. पॅरिसने सीनमधील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी 1.4 अब्ज युरो खर्च केले आहेत. त्यामुळे ट्रायथलॉनचा पोहण्याचा भाग आणि पुढील आठवड्यात होणारी मॅरेथॉन जलतरण शर्यत या स्पर्धा सीन नदीमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात.









