शिराळा/प्रतिनिधी
स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या व लढा दिलेल्या इतिहासाच्या नोंदी मधून अदखलपात्र असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बिळाशी (ता. शिराळा) ते सावळज (ता. तासगाव) पर्यंत तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र संकटे यांनी दिली. ते नागमणी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सकटे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या यादीत मातंग समाज व इतर उपेक्षित समाजातील शहीद झालेल्या व प्राणांची बाजी लावलेल्या लढवयांची दखल इतिहास आजतागायत घेतलेली नाही. त्यांच्या त्याग व बलिदानाचे समर्थन करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन ५ मे पासून करणार आहे. इंग्रजांच्या विरोधात १९३० साली देशात पहिल्यांदा ज्या बंडाची सुरुवात झाली त्या शिराळा तालुक्यातील बिळाशीच्या बंडाची ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुध्दा चर्चा झाली होती. त्या बिळाशी गावातून या तिरंगा यात्रेची सुरुवात करणार आहे.
त्यानंतर ही यात्रा आरळा, चरण, शिराळा, वाटेगाव, कासेगाव, वाळवा, पलुस, तासगाव अशी जाऊन तासगाव तालुक्यातील सावळज येथे या यात्रेचा समारोप होईल.
सदर तिरंगा यात्रा पंचाहत्तर गावातून पाच मे ते पंधरा मे अशी दहा दिवस चालणार आहे. यावेळी प्रत्येक गावातून प्रभात फेरी काढून शहीद झालेल्या व आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतीकारकच्या वारसदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर सरद गावातील ग्रामपंचायती समोर तिरंग्याला वंदन करण्यात येणार आहे.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, दिपक तडाखे, महिलाध्यक्ष सिमाताई आवळे, विजय दनाने, आनंदा महापुरे आदी उपस्थित होते.








