उद्यमबाग मुख्य रस्त्यावरील दुभाजक तीन ठिकाणी फोडला, उत्तर विभागातील समस्यांची पाहणी
बेळगाव : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबण्यासह झाडांची पडझड सुरूच आहे. बुधवारी टिळकवाडी येथील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आदी ठिकाणी झाडांची पडझड झाली. मारुतीनगर, अमननगर, पंजीबाबा यासह उत्तर भागात रस्त्यावर साचलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने वाहून जाण्यास वाट करून दिली. उद्यमबाग येथील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने दुभाजक तीन ठिकाणी फोडून पाणी वाहून जाण्यास मार्ग करून देण्यात आला. चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर व उपनगरात झाडे मोडून पडत आहेत. त्यामुळे हेस्कॉमचे नुकसान होत आहे. मंगळवारी स्वत: मनपा आयुक्त शुभा बी. अधिकाऱ्यांसमवेत फिल्डवर उतरल्या होत्या. विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाला लावले. बुधवारीही त्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरात फेरफटका मारला. विशेष करून उत्तर विभागातील समस्यांची पाहणी केली.
मारुतीनगर, अमननगर, पंजीबाबा भागासह उत्तर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून वाट करून देण्यात आली. यावेळी आमदार असिफ सेठ देखील उपस्थित होते. उद्यमबाग येथील डबल रोडवर गुडघाभर पाणी कालपासून तुंबून होते. सदर पाण्यातूनच वाहनांची ये-जा सुरू होती. त्यामुळे त्या ठिकाणचा दुभाजक तीन ठिकाणी फोडण्यात आला. त्यानंतर पाणी वाहून गेल्याने रस्त्यावरील पाणी जाऊन रस्ता मोकळा झाला. तसेच चार ठिकाणी पुन्हा पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या व बुंधे मनपा आणि फलोत्पादन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हटवले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









