चिपळूण :
यावर्षी नगर परिषदेने शहरातील विविध भागात १,२०० वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला असून हे उदिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र बऱ्याच ठिकाणची वृक्ष लागवड मोठ्या रस्त्यांच्या कडेलाच केली जात असल्याने भविष्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील अडचणींचा विचार करुन वृक्ष लागवड करण्याची मागणी नागरिकांतू होत आहे.
सर्वत्र होणारी वृक्षतोड, त्याबदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्प्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यावर्षी तर उष्प्याने अधिकच हैराण केले होते. वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून अवकाळी पावसाने मे महिन्यात १० दिवस तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे काही निसर्गप्रमी सातत्याने नगर परिषद व वन विभागाकडे पत्रव्यवहार करुन वृक्ष लागवड करण्याची मागणी करीत आहेत. तसेच बदलणाऱ्या पर्यावरणाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरुन केल्या जात आहेत.
त्यामुळे दरवर्षी नगर परिषदेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावली जातात. यावर्षी १२०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यानुसार उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी ताम्हण, बाबू, फणस, आंबा, चिंच, काजू आदी प्रकारची वृक्ष येथे उपलब्ध केली आहेत. त्यांच्या लागवडीचा शुभारंभ५ जून रोजी केला गेला. तेव्हापासून वृक्ष लागवड सुरू झाली आहे. मात्र नगर परिषदेने उपलब्ध केलेली बहुतांशी झाडे ही मोठा विस्तार होणारी आहेत. असे असताना ती शहरातील मुख्य रस्त्यांच्या अगदी कडेला लावण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात ती बहरल्यानंतर त्यांच्या फांद्या रस्त्यांवर, विद्युत तारांवर पडण्यासह झाडे पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी भर बाजारपेठेत मोठी फांदी पडल्याने आता अनेक बाबी चर्चेत आल्या आहेत. या दुर्घटनेत दुचाकीवरील बाप-लेक सुदैवाने बचावले असले तरी ही घटना धोका स्पष्ट करणारी आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी वृक्ष लागवड करतानाच विशेष काळजी घेण्याची गरज आहे
- ही आहे समाधानाची बाब
गेल्या तीन वर्षात येथे लावलेल्या ४ हजार वृक्षांपैकी ३ हजार वृक्ष जगले आहेत. यासाठी उद्यान विभागात काम करणाारे कर्मचारी उद्यान विभागाचे प्रमुख साडविलकर यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार झाडांची देखभाल करीत आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत कामी येत असून ही समाधानाची बाब आहे. याचा विचार करता नव्याने होणारी वृक्ष लागवड सुरक्षित जागांवर करण्याची मागणी होत आहे.
- सर्वांना विश्वासात घेऊन लागवड करावी
शहर परिसरात यावर्षी वृक्ष लागवड करताना काही नागरीकांना विश्वासात घ्यावे असे नगर परिषदेला सूचवण्यात आले होते. मात्र प्रशासनाने तसे केले नाही. जी वृक्ष लागवड होतेय ती कौतुकास्पद आहे. तरीही भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन योग्य जागांवर झाडे लावणे गरजेचे असून त्यांच्या उंचीचे नियोजनही आतापासूनच करण्याची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन लागवड केल्यास ते अधिक सोयीचे ठरेल.
– प्रकाश उर्फ बापू काणे, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण
- भविष्यात धोका…
पावसामुळे झाडांची चांगली वाढ
भविष्यातील धोक्यांचा विचार करण्याची मागणी








