दोन दिवसांपासून फांदी काढण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : भोई गल्ली येथे झाडाची फांदी वीजवाहिन्यांवर मागील दोन दिवसांपासून लटकत आहे. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉम तसेच महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील शनिवारी व रविवारी या दोन्ही दिवसात फांदी काढण्यात आलेली नाही. यामुळे धोका निर्माण झाला असून शॉर्टसर्किटमुळे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्याही कोसळल्या. भोई गल्ली येथे एका सुकलेल्या झाडाची फांदी कोसळली. परंतु, ती वीजवाहिन्या व इंटरनेट केबलमध्ये अडकली. त्यामुळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर फांदी लोंबकळली आहे. स्थानिकांनी हेस्कॉम व मनपाकडे याबाबतची तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्याप कोणत्याच विभागाने दखल घेतली नाही. रविवारी सायंकाळपर्यंत फांदी तशीच अडकून असल्याने धोका निर्माण झाला आहे. याखालून सध्या वाहनांची ये-जा सुरू असून फांदी केव्हा खाली पडेल, याची शाश्वती नाही. वीजवाहिन्या एकमेकाला जोडल्या गेल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.









