चोवीस तासात दोन भावांसह 19 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत-बचावकार्यासाठी सूचना
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशात रविवारपासून विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रेधा उडाली आहे. या आपत्तीमध्ये गेल्या चोवीस तासात 19 जणांचा बळी गेल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सोमवारी सायंकाळी देण्यात आली. मृतांमध्ये कन्नौजमधील दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मदतकार्य जलदगतीने सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. सोमवारीही राज्यभर दिवसभर पावसाने हजेरी लावली. विशेषत: शहरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अनेक जिल्ह्यात रस्ते खराब झाले. राज्यात अतिवृष्टीमुळे 13, वीज पडून 4 आणि पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. कन्नोजमध्ये पावसामुळे घर कोसळल्याने अवनीश (15) आणि त्याचा भाऊ आलोक (12) यांचा मृत्यू झाला.
जीवितहानीचा सर्वाधिक फटका हरदोईला बसला असून तेथे चौघांचा मृत्यू झाला. तर बाराबंकीमध्ये तीन, प्रतापगढ आणि कन्नौजमध्ये प्रत्येकी दोन, अमेठी, देवरिया, जालौन, कानपूर नगर, उन्नाव, संभल, रामपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
पिकांना फटका, शाळांना सुट्टी
सुऊवातीचा पाऊस पिकांसाठी अनुकूल असला तरी आता अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचू लागल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळीच विविध जिल्ह्यातील शाळांना घाईघाईने सुटी जाहीर करण्यात आली. मंगळवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्या : मुख्यमंत्री
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्यात सहभागी व्हावे. पूरग्रस्त परिसरात भेट देऊन मदतकार्यावर लक्ष ठेवावे. आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना अनुज्ञेय मदत रक्कम त्वरित वितरित करावी. पाणी साचल्यास, पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था करावी. नद्यांच्या पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करावे, अशा अनेक सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा बैठक घेत जारी केल्या आहेत. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल शासनाला देण्यात यावा. अहवाल तपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









