प्रॅक्टिसचा परवाना समाप्त, तरीही रुग्णांची मोठी गर्दी
विज्ञानानुसार वय वाढण्यासह मेंदू शिथिल होत जातो, विचार करण्याच्या क्षमतेत घट होऊ लागले, परंतु एक डॉक्टर वयाच्या 102 व्या वर्षी लोकांवर उपचार करत आहे. वय अधिक असल्याने या महिलेचा प्रॅक्टिसचा परवाना समाप्त झाला आहे, तरीही तिच्या घराबाहेर रुग्णांची मोठी गर्दी असते. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत रुग्णांची देखभाल करण्याची या महिलेची इच्छा आहे. मी आणखी 10 वर्षे जगणार असल्याचे या महिलेचे सांगणे आहे.
अमेरिकेच्या एरिझोनामध्ये राहणाऱ्या ग्लेडिस मॅकगॅरी यांची ही कहाणी आहे. मॅकगॅरी यांना बर्थिंग एक्सपर्ट म्हणून ओळखले जाते. जगभरात त्यांनी हजारो प्रसूती घडवून आणल्या आहेत. भारत, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातही त्यांनी सेवा बजावली असून याची छायाचित्रे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. 102 व्या वर्षीही त्या अत्यंत तंदुरुस्त आहेत. अलिकडेच त्यांनी स्वत:चे नवे पुस्तक ‘द वेल लिव्हड् लाइफ’ लिहिले असून यात 6 गुपिते उघड केली आहेत.
माझ्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते, त्यानंतर कुणाच्याही मदतीशिवाय जिना उतरते. सकाळी नाश्त्यात चोकर अन् प्रून ज्यूसचा आनंद घेते. दुपारी सॅलड अन् सूप इतकाचा आहार आहे. फावल्या वेळेत विणकाम करते, माझी दृष्टीक्षमता काहीशी कमी झाली असल्याचे त्या सांगतात. मॅकगॅरी यांना अलिकडेच स्टेम सेलचे एक औषध मिळाले आहे. या औषधामुळे माझ्या जीवनशक्तीत फरक पडल्याचे त्यांचे मानणे आहे. या औषधामुळे वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे मानले जाते. परंतु वैज्ञानिक अद्याप यासंबंधी अंतिम निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत.









