डायबेटिस, कॅन्सरग्रस्तांना दिलासा : 359 औषधे मोफत मिळणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून (एम्स) उपचारासाठी येणाऱ्या ऊग्णांना अधिक लाभ मिळावा यासाठी मोफत दिल्या जाणाऱ्या औषधांची यादी अपडेट करण्यात आली आहे. या यादीमध्ये कर्करोगाच्या 45 औषधांसह अन्य 63 औषधांचा सध्याच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एम्समध्ये मोफत मिळणाऱ्या औषधांची संख्या 359 झाली आहे. याशिवाय डायबेटिससाठी (मधुमेह) नियमित इन्सुलिनचे इंजेक्शनही मोफत मिळणार आहे. यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या औषधांमध्ये पाल्बोसिक्लिब, डेसैटिनिब, मेथोटेक्सेट, ट्राइमेजेट, मेस्ट्रोल एसीटेट आणि ल्यूकोवोरिन यांचा समावेश आहे.
एम्सने मोफत औषधांची संख्या वाढवल्यामुळे असंख्य गरीब लोकांना फायदा होणार असल्याचे एम्सचे संचालक एम श्रीनिवास यांनी सांगितले. मोफत उपलब्ध असलेल्या औषधांमध्ये सामान्यत: इमॅटिनिब आणि डेसॅटिनिब औषधे (रक्त कर्करोगाच्या ऊग्णांसाठी), टॅमॉक्सिफेन, पॅल्बोसीक्लिब, सायक्लोफॉस्फामाइड आणि अॅनास्ट्रोझोल (स्तन कर्करोगाच्या ऊग्णांसाठी), टेमोझोलोमाइड (विशिष्ट प्रकारच्या मेंदूच्या कर्करोगासाठी) यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अन्य काही औषधांचाही ‘मोफत’ यादीत समावेश केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.









