वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियन संघातील भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला झालेल्या दुखापतीमुळे प्रचंड वेदना जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्याला वेदनाशामक इंजेक्शन दिले आहे. स्मिथच्या मनगटाच्या स्नायूला ही दुखापत गेल्या जुलै महिन्यात अॅशेस मालिकेतील लॉड्सच्या कसोटीत झाली होती.
या दुखापतीमुळे स्मिथला या अॅशेस मालिकेतील उर्वरित सामन्यात तसेच त्यानंतर सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यालाही मुकावे लागले होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघासमोर दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघातील आणखी एक प्रमुख खेळाडू ट्रेविस हेड याच्या हाताचे हाड मोडले असून तो लागलीच मायदेशी रवाना होणार असल्याचे समजते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध संघांना आपल्या अंतिम 15 खेळाडूंची यादी 28 सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी लागेल. त्यानंतर काही बदल करणे आवश्यक असेल तर स्पर्धा आयोजकांची परवानगी जरुरीची राहिल. या आगामी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना भारताबरोबर चेन्नईत 8 ऑक्टोबरला होत आहे.









