आज भीमगड खरेतर विस्मृतीतच जाणार होता. आपल्या देशावरती एकेकाळी सत्तास्थानी असलेल्या मोंगलाच्या ताब्यात गोव्याची भूमी कोकणसह होती. महाराष्ट्रात असलेल्या कोकणाचा काही भाग त्याचप्रमाणे गोव्यातल्या सत्तरी, डिचोली, पेडणे आदी तालुक्यांचा राज्यकारभार म्हादईच्या खोऱ्यात वसलेल्या भीमगड या परगण्याच्या मुख्यालयातून पाहिला जात होता. आज भीमगडावरती परगण्याचे मुख्यालय होते, हे कोणाला सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही, इतके परिवर्तन इथे घडलेले आहे. मानवी संस्कृतीसाठी जेथे पोषक हवामान असते, जगण्यासाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते तेथेच ती बहरते. भीमगड आणि त्याच्या परिसरातून जुन्या काळच्या डोंगर माथ्यावरच्या हळशी म्हणजेच प्लासिका या राजधानीच्या कदंब राजवटीतल्या शहराकडे जाणारा केळघाट अस्तित्वात असल्याने त्याला महत्त्व लाभले होते. महाभारतासारख्या महाकाव्यात पांडवांत भीम हा आपल्या पराक्रम आणि शौर्यामुळे लोकमानसात अजरामर झाला होता. त्याच्या रिपूमर्दन आणि निर्भयतेच्या असंख्य वदंता पिढ्यान्पिढ्या भारतीय समाजात रुढ आहे. सत्तरीत कोदाळच्या जंगलात असलेला महाकाय शिलाखंड तिथल्या लोकमानसात ‘भिवगो गुणो’ म्हणून परिचित आहे. म्हादईच्या पात्रात सोनाळच्या परिसरात दगडावरती उमटलेली महाकाय पाऊलखुणा ‘भीमाचे पावल’ या नावाने ओळखले जाते. कृष्णापूरच्या जंगलात दुर्गम ठिकाणी वसलेला दगडाचा उंच सुळका पूर्वापार अजस्त्र आणि निसर्गाच्या चमत्कृतीची प्रचिती देणारा असल्याने सत्तरी आणि खानापूर परिसरात हा शिलाखंड भीमगड या नावास पात्र ठरलेला आहे. या भीमगडावरती पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्रोत बारामाही उपलब्ध असल्याने आणि जंगलात कंदमुळे, फुले-फळे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने तेथे अश्मयुगापासून आदिमानवाचे वास्तव्य होते. कालांतराने मोंगल अमदानीत भीमगडाला परगण्याचे मुख्यालय म्हणून स्थान लाभले आणि त्यामुळे घोडदळ, पायदळातले सैन्य आणि त्यासाठी आवश्यक कारागिर, कलाकार त्याचप्रमाणे गडाच्या अखत्यारीत असलेल्या महसुली गावाचे प्रशासन पाहणारी लोकवस्ती इथे होती. आज भीमगडावरच सारा इतिहास आणि संचिते विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. भीमगड आणि परिसरातल्या जंगलांचे रक्षण वन्यजीव संरक्षण कायद्याने आणि त्याच्या पूर्वी राखीव जंगलक्षेत्र म्हणून झाले नसते तर पर्यावरणीय दृष्टीने संवेदनाक्षम असलेले हे क्षेत्र तिळारीच्या खोऱ्यासारखे नगदी पिकांच्या त्याचप्रमाणे बागायती आणि पर्यटनाच्या प्रकल्पाखाली हा हा म्हणता उद्ध्वस्त झाले असते. भीमगड परिसरातील मेंडिल, गवाळी त्याचप्रमाणे सोसोगड येथे मँगनिज खनिजाचे साठे असल्याने ब्रिटीश अमदानीत खनिज उत्खननासाठी प्रायोगिक तत्त्वावरती चाचपणी झाली होती. गोव्याच्या हद्दीत येणाऱ्या सोसोगडावरती पोर्तुगीज अमदानीत मँगनिजाचे उत्खनन मनुष्यबळाद्वारे करण्याचे प्रयत्न झाले होते. खनिज उत्खनन, नगदी पिके आणि बागायती लागवड, पर्यावरणीय प्रकल्प अशा बाबींसाठी हा परिसर वापरला गेला तर म्हादई नदीच्या मुख्य पाणलोट क्षेत्रावरती त्याचे दुष्परिणाम होणार होते. आज केरळसारख्या साक्षरता आणि सुशिक्षितेचे लक्षणीय प्रमाण असलेल्या राज्यात विकासाच्या ज्या नमुन्याचे अवलंबन केले आणि बहुतांश नद्यांना जलसिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीसाठी धरणांच्या साखळीने बंदिस्त केले, त्यामुळे अतिपर्जन्यवृष्टीत तिथल्या लोकांना पळता भुई थोडी झाली. कर्नाटक सरकारातल्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या शेजारी असलेल्या महाराष्ट्राचा कित्ता धरणांच्या संदर्भात गिरवलेला आहे. त्यामुळे पश्चिम घाटातून उगम पावणारी कावेरीसारखी महाकाय नदी असो अथवा काळी गंगेसारखी छोटी नदी असो, त्यांना धरणांच्या साखळीद्वारे बंदिस्त करण्याचे षड्यंत्र सफल झाले तरीसुद्धा कर्नाटकातल्या लोकांची पिण्याच्या, सिंचनाच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण काही कमी करणे जमलेले नाही. म्हादई बारामाही गोडे पाणी कवेत धारण करून वाहत असल्याने, तिला लाभलेल्या दऱ्या-खोऱ्यात जलसिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीसाठी धरणांची साखळी निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आज म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटक सरकारला म्हादईच्या महत्त्वपूर्ण असलेल्या दोन उपनद्यांचे पाणी मलप्रभेच्या खोऱ्यात नेण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे. कळसा, हलतरा आणि भांडुरा या तीन नाल्यांशिवाय कर्नाटक सरकारने बैल, इरती, मरुडेहल्ल, पानशिरा, कोटणी अशा नाल्यांवरती धरणाच्या साखळीचे नियोजन केले होते. कर्नाटकचे हे सर्व प्रकल्प लवादाने मान्य केले असते तर गोव्याच्या मुख्य म्हादईच्या अस्तित्वासमोर गंभीर संकटे निर्माण झाली असती. त्यासाठी या असंख्य जलस्रोतांना पूर्वापार लाभलेल्या पाणलोट क्षेत्राला शाश्वत सुरक्षा कवच मिळणे गरजेचे होते आणि म्हणून दीड दशकापूर्वी प्रारंभी भीमगड अभयारण्याच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाचे समर्थन मी केले. 1999 साली गोव्यात राष्ट्रपती राजवटीत म्हादई आणि नेत्रावळी या दोन अभयारण्यांचे प्रस्ताव मूर्त स्वरुपात आल्यावरती आम्ही भीमगड अभयारण्याचा पाठपुरावा आरंभला पण तत्कालीन राजकारण्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पर्यावरण क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी भीमगड आणि म्हादईच्या परिसराला सह्याद्री पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राचा दर्जा लाभला म्हणून सुरू केलेल्या चळवळीत मी राज्य संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या संबंधित समविचारी घटकांना एकत्रित आणून बैठका आयोजित केल्या आणि एकमताने प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला परंतु खाण मालक, जंगल तोडे आणि अन्य प्रकल्प इथे आणणाऱ्यांच्या दबावासमोर सह्याद्री पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राचा प्रस्ताव शीतपेटीत गेला. सातत्याने आरंभिलेल्या चळवळीमुळे कर्नाटक सरकारने शेवटी भीमगड परिसराला अभयारण्याचा दर्जा दिला आणि त्यामुळे या समृद्ध जंगलातून बारामाही गोडे पाणी घेऊन वाहणाऱ्या असंख्य जलस्रोतांना संरक्षण लाभलेले आहे. भीमगडचा परिसर गोव्याला बारामाही पाणी पुरवणारा जलस्रोतांचा खजिनाच आहे.
– राजेंद्र पां. केरकर








