कोल्हापूर / सुधाकर काशिद :
कोल्हापूर म्हणजे इतिहास, कोल्हापूर म्हणजे कला संस्कृतीची नगरी, कोल्हापूर म्हणजे कुस्ती, कोल्हापूर म्हणजे चित्रपट नाट्यासृष्टीचे माहेरघर अशी ओळख आहे. आणि ही ओळख नक्कीच काही पिढ्यांची आहे. पण कोल्हापूर म्हणजे वाचन संस्कृतीचे एक जिवंत प्रतीक आहे. ही ओळख मात्र अलीकडच्या काही वर्षात थोडी पुसट झाली आहे. काळाच्या ओघात मोबाईल संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. वाचन आहे ते मोबाईल वरच्या छोट्या पडद्यावरचे आहे. पण या मोबाईलच्या छोटा पडद्याआड समृद्ध वाचनाचे एक मोठे क्षितिज दडले गेले आहे. पण कोल्हापूरच्या वाचन संस्कृतीची एक जागती ओळख येथील करवीर नगर वाचन मंदिराने आपल्या ताकदीने जपली आहे.
अर्थात वाचन मंदिर नव्हते तेव्हा कोल्हापुरात वाचनच करणारे कोणी नव्हते असे नव्हे पण कोल्हापुरात वाचनाला पूरक असे एक सार्वजनिक ठिकाण आवश्यक होते आणि ते 15 जून 1850 रोजी म्हणजे बरोबर 175 वर्षांपूर्वी कोल्हापूर नेटिव लायब्ररी या संस्थेच्या निमित्ताने कोल्हापूरकराना मिळाले. करवीर संस्थानचे शिवाजी महाराज तिसरे यांच्या कारकिर्दीत व त्यावेळचे कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट एच एल अंडरसन यांच्या पुढाकाराने ते सुरू झाले. अशी माहिती आहे की कोल्हापुरातील रविवार वाड्यात जाहीर बैठक घेऊन वाचनालयाच्या स्थापनेचा हेतू सांगण्यात आला. (त्या निमित्ताने कोल्हापुरात रविवार पेठ बिंदू चौक परिसरात कोठेतरी रविवार वाडा होता याचीही नवी माहिती आपल्या पिढीपर्यंत आली) याच बैठकीत करवीर संस्थाननी 1000 रुपयाची देणगी वाचनालयासाठी देऊन करवीर संस्थांची दिशा पहिल्यापासून कशी समाजाभिमुख होती याची प्रचिती दिली. ही देणगी व वर्गणीतून जमा झालेली रक्कम यातून वाचन मंदिराची सुरुवात झाली.यावेळी या वाचन मंदिराचे 17 सभासद झाले व त्यांच्याकडून दरमहा फी रूपाने 15 रुपये उत्पन्न मिळू लागले.
त्याकाळी ज्ञानोदय ज्ञानप्रकाश वर्तमान दीपिका धूमकेतू ही वृत्तपत्रे वाचनालयात येत होती. पण फी मात्र करवीर संस्थान चार रुपये, पोलीस अधिकारी ओल्ड फिल्ड, वेस्ट रॉफ साहेब, वॉलर साहेब, उपाध्ये, पटवर्धन पंतप्रतिनिधी, हिम्मत बहाद्दूर चव्हाण, दादासो भोसले खानवटकर, इंग्लिश स्कूलचे हेडमास्तर असे सर्वजण मिळून 18 रुपये फी जमा होत होती. काही कालावधीनंतर युरोपियन अधिकाऱ्यांनी एजन्सी बुक क्लब म्हणून त्यांची स्वतंत्र लायब्ररी काढली. ही आणखी एक स्वतंत्र लायब्ररी निघाल्यानंतर मूळ कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररीची पुनर्रचना करण्यात आली व त्यासाठी माधव मोरेश्वर कुंटे, विश्वनाथ धुरंदर ,बाळ परशराम पंडित, विनायक रघुनाथ कटके यांची समिती नेमण्यात आली.
वाचन मंदिरासाठी स्वतंत्र जागा जुन्या राजवाड्याजवळ निवडण्यात आली. 1879 साली इमारतीचे बांधकाम सुरू झाले व 1881 साली ते पूर्ण झाले. आज त्याच जागी करवीर नगर वाचन मंदिर उभे आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे 17 व्या अधिवेशन याच नगर वाचन मंदिराच्या वतीने भरवण्यात आले. आज जेथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तेथे आयर्विन म्युझियम होते. तेथे हे साहित्य संमेलन झाले. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज अध्यक्षस्थानी होते. पण ते न आल्याने बडोद्याचे नायब दिवाण माने पाटील यांनी त्यांचे भाषण वाचून दाखवले. आता करवीर नगर वाचन करवीर नगर वाचन मंदिर म्हणजे साहित्य संस्कृतीचे एक मोठे दालन आहे.
- शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष
हे वर्ष करवीर नगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचे आहे. एकूणच वाचन संस्कृतीत झालेला बदल, प्रत्यक्ष पुस्तके वाचनावर कमी झालेला ओढा याची थोडी तरी नक्कीच झळ बसलेली आहे. पण करवीर वाचन मंदिराने वाचन संस्कृती अधिक जोमाने वाढवण्याचे ठरवले आहे. ते फक्त वाचण्यासाठी पुस्तकेच देतात असे नव्हे तर वाचक लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. थेट लेखक आणि वाचक यांचा संवाद घडवून आणतात. एखाद्या पुस्तकावर परिचर्चा घडवून आणतात. संस्कार वर्ग चालवतात. लहान मुलांवर या वयातच वाचनाचे संस्कार व्हावेत म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. करवीर नगर वाचन मंदिराकडे साहित्याचा खजिना नक्कीच आहे. पण ते साहित्य केवळ बंदिस्त कपाटात पडून राहू नये म्हणून वाचन मंदिराच्या वतीने ग्रामीण भागातील ग्रंथालयांना ही पुस्तके एक महिन्यासाठी दिली जातात. जेणेकरून तेथील वाचकांना त्याचा लाभ होईल हे पाहिले जाते. कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिर म्हणजे अशा साहित्य संस्कृतीचा एक मोठा खजिना आहे. या वाचनालयाचे सभागृह म्हणजे सार्वजनिक व्यासपीठ आहे. या छोट्याशा सभागृहात अनेक मोठ्या मोठ्या विचारवंतांची, साहित्यिकांची, अर्थतज्ञांची, क्रीडापटूंची व्याख्याने झाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक साहित्यिक चळवळीत करवीर नगर वाचन मंदिराने दिलेली 175 वर्षाची साथ खूप मोलाची आहे.
1. कोल्हापूर म्हणजे कला संस्कृतीची नगरी अशा प्रकारे कोल्हापूर वाचन संस्कृतीचे जीवंत प्रतिक
2. करवीर नगर वाचन मंदिर म्हणजे अनमोल ठेवा
3. तब्बल 175 वर्षांची अनमोल साथ








