वार्ताहर/गुंजी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून गुंजी, कामतगा, डिगेगाळी, घोसे जंगलातून हत्ती पिटाळण्याचे काम वनखात्याने हाती घेतले असून लोंढा वनखात्याकडून दररोज दहा ते बारा किलोमीटरचा खडतर प्रवास जंगल भागातून हत्तींना पिटाळण्यासाठी केला जात आहे. बुधवारी या मोहिमेत वनखात्याचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होऊन हत्ती पिटाळण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये डीसीएफ मारिया ख्रिस्ती राजू आणि एसीएफ सुनिता निंबरगी यांचाही समावेश होता. मंगळवारी सायंकाळी सदर हत्तींना घोसे जंगलापर्यंत पिटाळण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी घोसे जंगलात हत्तींचा शोध घेण्यात आला. येथील जंगल घनदाट असल्याने बऱ्याच परिश्रमानंतर दुपारी हत्तींचा ठावठिकाणा सापडल्याने तेथून त्यांना कापोलीहद्दीपर्यंत हुसकावल्याचे लोंढा वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सदर हत्तींना नागरगाळीपर्यंत हुसकावण्यात येणार असून त्यासाठी गुऊवारीही मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वीस दिवसांपासून गुंजीसह लोंढा वनविभागात हत्तींनी धुमाकूळ घालून नुकसान केले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह नागरिकांचेही जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा विचार करूनच हत्ती हटाव मोहीम हाती घेतली आहे.









