महामार्गावरील धोकादायक झाडांकडे वनखात्याचे दुर्लक्ष
उदय सावंत/ चोरला : दरवर्षी गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट महामार्गावरील धोकादायक झाडे पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह रस्त्यावर पडल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्प होते. यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यंदाही महामार्गावरील धोकादायक झाडे कापणे गरजेचे असताना ती अद्याप कापलेली नाहीत. यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून वाहतूक करणे डोकेदुखीचे ठरणार आहे. गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरातून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सुरक्षित रस्ता व कमी अंतर यामुळे वाहन चालक व प्रवासी याच मार्गाचा प्रामुख्याने अवलंब करीत असतात. परंतु जास्त पावसामुळे या मार्गाच्या बाजूला असलेली झाडे उन्मळून पडतात. यामुळे वाहतूक ठप्प होण्याचेही प्रकार घडतात. गेल्या पाच वर्षात पावसाळ्यात अनेक वेळा या कारणामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे या मार्गावरील धोकादायक झाडे कापणे गरजेचे आहे. परंतु याकडे वन खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग
या मार्गावरील धोकादायक झाडे कापणे हा आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग आहे. यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. गेल्या अनेक वर्षापासून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाद्वारे या भागातील धोकादायक झाडे झाडे कापण्यात येत असतात. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी धोकादायक झाडे कापण्याचे निर्देश वन खात्याला देऊन अग्निशामक दलाची मदत घेण्यास सांगितले होते. परंतु वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याने सदर आदेश मागे घ्यावा अशी विनंती करणारे पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांनाच पाठविलेले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आता अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वन खात्याच्या संबंधित अधिक्रायांनी अशा प्रकारचे पत्र दिल्यामुळे उपजिल्हाधिकारी झाडे कापण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत. मात्र येणाऱ्या पावसाळ्यामध्ये झाडे पडून रस्ता बंद झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे.
घनदाट जंगलातून सुमारे 12 कि.मीचा रस्ता
सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे जंगलातून जात आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या घाटमाथ्यावरील रस्त्याच्या बाजूला अनेक वेळा दरडी कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे रस्त्यावर पडतात. यामुळे तासनतास वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडलेले आहेत. गेल्यावर्षी अनेक वेळा वाहने रात्रभर अडकून पडलेली होती. सत्तरी तालुका हा पूर्णपणे जंगलाने व्यापलेला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडतात. यातील अधिक घटना या महामार्गावर घडत असतात. यंदा धोकादायक झाडे कापण्यात न आल्यामुळे अग्निशामक दलाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.









