(उत्तरार्ध)
ना. सी. फडक्यांना महाबळेश्वरच्या डोंगरात अशी एक चुकलेली अनवट वाट पाऊस पडून गेल्यानंतर मिळाली होती. चंद्रसुद्धा ढगात लपलेला, काळोखाचा रंग काळा असतो अशी जाणीव आता डोळ्यांना नक्की झालेली होती पण चाचपडत चालताना पायाला दृष्टी येते की काय अशी जाणीवही तिथे सुखावून गेली. आणि एवढ्यातच पायाजवळून सरपटत कोणता तरी जीव गेला की, ते मात्र कानाने टिपलं जातं. त्या प्राण्यांना आडवं जाणं योग्य नाही, म्हणजे अगदी मांजर आडवं जावं अशी ती स्थिती त्यांना असते. थोडा वेळ थांबून ना. सी. फडके पुढे निघाले आणि पुढच्या दरीमध्ये त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा सुंदर एक महोत्सव त्यांना दिसला. ‘काजव्यांचा महोत्सव’ हा पाहतांना ते देहभान विसरून गेले. असंच काहीसं अनेकांना चुकलेल्या वाटेचं सोनं होताना दिसतं. एखाद्या चुकीची किंमत देखील इतकी सुंदर, देखणी असू शकते, याची जाणीव या ठिकाणी होते. अशा अनवट वाटा नेमकं काय देतात? असा प्रश्न केला तर उत्तर मिळतं ‘आत्मभान’. डोंगरांना उराऊरी भेटणं, पागोळ्यांच्या लयीत चालणं, शांततेचं निळसर काळपट संगीत ऐकणं, म्हणजे मल्हाराची धुन ऐकण्याचेच भाग्य इथे लाभतं. या संगीत महोत्सवात पावसाच्या सरी लपेटून घ्यायला लागतात. ढगांना टेकून.. धुक्याचा हुक्का ओढायचा असतो. त्या धुंदीत ब्रम्हानंदाची अनुभूती घ्यायची असते. नक्षत्रांच्या वेलबुटीचे न उलगडणारे कोडे सोडवत मात्र पुढे निघायचं. एखाद्या झाडाखाली बसून निवांतपणे या कोड्याचे उत्तर शोधताना जो काही विरंगुळा मिळतो त्याला तोड नाही. या वाटांवर चालणाऱ्यांना सुगंधाचे महोत्सव सुद्धा एखाद्या पर्वणीसारखेच भेटतात. गवताला, झाडांना, मोहरांना, एक विशिष्ट वास असतो…याच्या जाणीवा या वाटेवर आपल्यात जागृत होतात. पण ह्या वाटांवर चालणाऱ्यांना मात्र कस्तुरी ग्रुप व्हायला लागतं तेव्हाच हे सापडतं. अशा अनवट वाटेच्या माणसांचे पाय खऱ्या अर्थाने मातीचे असतात. मातीचा नेमका पोत त्यांना जाणवतो. त्यासाठी मात्र हमरस्ता किंवा मळलेल्या वाटा सोडायला लागतात. दगड गोट्यांमधून काट्याकुट्यांमधून या वाटा शोधायला हव्यात. या वाटेवर कधीही न पाहिलेले कीटक, पक्षी, प्राणी, एकदा तरी आपल्याला भेटून जातातच. आपल्याच मस्तीत जगणारे चिंतामुक्त समाधानी जगाचे दर्शन खऱ्या अर्थाने इथे घडते. आपण या सगळ्यांच्या पुढे किती क्षुद्र आहोत याची जाणीव मात्र प्रकर्षाने होते. या डोंगरदऱ्यातल्या वाटा आपल्याला रोजच्या जगण्यातल्या अनेक वाटा दाखवत असतात.