अभिजित पाटील यांनी मित्रासह लंडनहून गाठले बेळगाव
बेळगाव : बाप्पांच्या भक्तीपोटी केवळ एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 17 हजार किलोमीटरचा प्रवास आपल्या कारने करून बेळगावला भक्त दाखल झाले आहेत. बेळगावचेच असलेले व सध्या लंडनमध्ये कार्यरत असणारे अभिजित पाटील यांनी आपल्या कारने लंडनहून बेळगावपर्यंत तब्बल 17 हजार किलोमीटरचा प्रवास केला असून मंगळवारी दुपारी ते बेळगावमध्ये आपल्या स्वगृही दाखल झाले. अर्थात स्वमग्नता याबद्दल जनजागृती करणे हासुद्धा त्यांच्या या प्रवासाचा हेतू होता. अभिजित पाटील मूळचे बेळगावचे. युनियन बँकेमध्ये सेवा बजावलेले सी. के. पाटील व रंजना पाटील यांचे ते सुपुत्र. अनेक भक्तांप्रमाणे अभिजितसुद्धा बाप्पांचे भक्त. दरवर्षी ते गणेशोत्सवाला आवर्जुन बेळगावला येतात. मात्र, काहीतरी वेगळे करायचे असा विचार करत असतानाच त्यांना चार चाकीने प्रवास करण्याची कल्पना सुचली आणि त्यांचा निर्धार पक्का झाला.
लंडनहून 12 जुलै रोजी ते आपला मित्र हुकुमचंद शहा यांच्यासोबत निघाले. आपल्या प्रवासात त्यांनी यूके, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, सर्बिया, बल्गेरिया, तुर्की, जॉर्जिया, रशिया, कझाकस्तान, उझ्बेकिस्तान, केजेस्तान, चीन, नेपाळ ते भारत असा एकूण 36 दिवसात 17 हजार किलोमीटरचा प्रवास केला. हा अनुभव कसा होता, या प्रश्नावर ते म्हणाले, मनाने निश्चय तर केला होता. परंतु काही वेळा वादग्रस्त ठिकाणांहून आम्हाला प्रवास करावा लागला. रशियामध्ये युद्धाचे ढग अजूनही पूर्ण हटले नाहीत. त्यामुळे आम्ही साशंक होतो. नेपाळजवळ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु आम्ही सुखरुपपणे प्रवास करत बेळगावलों पोहोचलो. ही त्या बाप्पांची कृपा आहे.









