अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजयपुरम असे करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच केली. पोर्ट ब्लेअरला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर शहरातील अटलांटा पॉईंटवर वसलेले आहे. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी ओळखले जाणारे हे सेल्युलर जेल आज पर्यटनस्थळ बनले आहे. याशिवाय येथील अनेक पर्यटनस्थळे देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
पूर्वीचे पोर्ट ब्लेअर आणि आताचे श्री विजयपुरम हे निसर्ग सौंदर्यासाठी जगभर
प्रसिद्ध आहे. जगातील सर्वाधिक सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून पोर्ट ब्लेअरचे नाव घेतले जाते. हिंदी महासागराच्या उत्तर पूर्व भागात स्थित अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये पोर्ट ब्लेअर आहे. सध्या या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. आता पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजयपुरम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना सेल्युलर जेलमध्ये पाठविले जात असे. पारतंत्र्याच्या काळातील गुलामीचे प्रतीक असणाऱ्या स्थळांची नाव बदलण्याचे केंद्र सरकारने ठरविले. त्यातून पोर्ट ब्लेअर आता श्री विजयपुरम बनणार आहे.
या द्विपसमूहाचा इतिहास मराठी शासनकर्त्यांशी निगडित आहे. मराठी शासनकर्त्यांनी 17 व्या शतकात येथे कब्जा केला होता. मात्र, नंतरच्या काळात इंग्रजांच्या राजवटीत हा द्वीपसमूह त्यांच्या ताब्यात गेला. याच द्वीपसमूहाच्या दक्षिण भागाला इंग्रजांनी पोट ब्लेअर नाव दिले. इंग्रज राजवटीतील लेफ्टनंट आर्चिबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून 1789 मध्ये पोर्ट ब्लेअर नाव ठेवले गेले. बंगालमध्ये सत्ता असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीने येथे एक कॉलनी स्थापन केली. वादळात भरकटलेल्या जहाजांना निवारा देण्यासाठी या कॉलनीची निर्मिती करण्यात आली. कालांतराने कॉलनीला उत्तर भागात शिफ्ट करण्यात आले. येथे अॅडमिरल विलियम कार्निवलच्या नावानुसार पोर्ट कार्निवालीस नामकरण करण्यात आले. हे दोन्ही मिळून पोर्टब्लेअर बनले. मात्र, या शिफ्टिंगदरम्यान अनेकांचे प्राण गेले आणि इंग्रजांना 1796 मध्ये ही प्रक्रिया थांबवावी लागली. 1857 च्या क्रांतीनंतर येथे इंग्रजांनी जेल बनवली. सुऊवातीला येथे काहीच सुविधा नव्हत्या. मात्र, 1897 मध्ये जेलची निर्मिती सुरू झाली. येथे सात विभागात 694 कोठड्या बनवल्या गेल्या. मात्र, कालौघात या जेलमध्ये केवळ तीनच हिस्से बाकी आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1942 ते 1945 पर्यंत तीन वर्षांमध्ये हा भाग जपानच्या ताब्यात होता. त्यानंतर तो भारताच्या ताब्यात आला. सेल्युलर जेल भारतात ‘काळापाणी’ नावाने ओळखली जाते. या जेलमध्ये पाठविणाऱ्यांना जिवंत परतणे मुश्किल मानले जात असे. उर्वरित भारताशी या जेलचा काही संपर्क नव्हता. आता भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेल्युलर जेल पाहण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी जातात. सरकारच्यावतीने या जेलवर ‘लाईट अँड साऊंड’ शो केला जातो. या संपूर्ण प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम असून देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. येथे जाण्यासाठी हवाई मार्ग सोपा आहे. तर जहाजमार्गे कोलकात्याहून पोर्ट ब्लेअरला जाता येते. मात्र, त्यासाठी अधिक वेळ लागतो.
विमानतळ टर्मिनल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे गतवर्षी उद्घाटन केले होते. नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 710 कोटी ऊपये खर्च आला असून दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी वाहतुकीची याची क्षमता आहे. सध्याच्या
टर्मिनलमध्ये 4000 पर्यटक वाहतुकीची क्षमता होती. नवीन टर्मिनलमुळे ही संख्या 11,000 वर गेली असून आता एकाचवेळी दहा विमाने येथे उभी करता येतील. त्यामुळे उ•ाणांची संख्या वाढणार आहे. या भागात अधिक पर्यटक दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.
पोर्ट ब्लेअरची सध्याची लोकसंख्या 1 लाख 52 हजार आहे. तेथे हिंदुंची संख्या सर्वाधिक म्हणजे 74.37 टक्के आहे. त्याखालोखाल मुस्लीम 12.43 टक्के, ख्रिश्चन 12.43 टक्के, शिख 0.51 टक्के, बुद्धिस्ट 0.05 टक्के, जैन 0.01 टक्के आणि अन्य 0.10 टक्के आहेत. तेथे बंगाली, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषा बोलली जाते. बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सायन्स सेंटर
अंदमान अँड निकोबार प्रशासनातर्फे पोर्ट ब्लेअर येथील सायन्स सेंटर चालविले जाते. ते कोलकाता येथील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमच्या सहकार्याने 2003 मध्ये कार्यान्वित झाले. तेथे फन सायन्स गॅलरी, अंदमान अँड निकोबार गॅलरी, मॉडर्न सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी गॅलरी आहे. 100 हून अधिक प्रतिकृती तेथे पाहायला मिळतात.
वीकेंड पिकनिक पॉईंट
पोर्ट ब्लेअरपासून 17 किमी अंतरावर असलेले बेदोनाबाद प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. वीकेंड पिकनिक पॉईंट म्हणून ते फेमस आहे. टेलिस्कोपमधून ग्रह तारे निरीक्षणाची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
माऊंट मणिपूर राष्ट्रीय उद्यान
दक्षिण अंदमान बेटांवर स्थित माऊंट मणिपूर राष्ट्रीय उद्यान हे अंदमान बेटांमधील नऊ राष्ट्रीय उद्यानांपैकी सर्वात सुंदर आहे. हे अंदमानचे तिसरे शिखर आहे, जे 383 मीटर (1,257 फूट) वर उभे आहे. या उद्यानातून आकर्षक सूर्यास्त आणि सूर्योदय अनुभवता येतो.
वंडूर बीच
पोर्ट ब्लेअर, दक्षिण अंदमानमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक वंडूर बीच पोर्ट ब्लेअरच्या नैऋत्येला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील रंगीबेरंगी कोरल पर्यटकांचे आकर्षण ठरते. स्विमिंग आणि सूर्यस्नानासाठी हा बीच प्रसिद्ध आहे. समुद्राचे स्वच्छ निळे पाणी आणि किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या बोटी असे विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालच्या उंच भरतीमुळे तयार झालेल्या गुहेसाठीही हा बीच ओळखला जातो.
जॉगर्स पार्क
जॉगर्स पार्क हे पोर्ट ब्लेअरमधील उद्यान निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअरमधील सर्वात स्वच्छ उद्यानांपैकी ते एक आहे. हे ठिकाण एका टेकडीच्या शिखरावर वसलेले आहे. जवळचे रॉस आयलंड आणि नॉर्थ बे आयलंडसह निळ्या महासागराची भव्य दृश्य येथून नजरेस पडतात. येथून पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे स्पष्ट दृश्य दिसते. येथून फ्लाईट लँडिंग आणि टेक ऑफ पाहणे ही वेगळीच अनुभूती ठरते.
लक्ष्मणपूर बीच
लक्ष्मणपूर बीच हा अंदमान आणि निकोबार बेटांमधील नील बेटावर असलेला एक नयनरम्य पांढरा वाळूचा समुद्रकिनारा आहे. ज्याला आता शहीद द्वीप म्हणून ओळखले जाते. स्नॉर्कलिंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. कोरल रिफ आणि स्वच्छ हिरव्या समुद्राच्या पाण्यासाठी हा बीच ओळखला जातो. ‘हावडा ब्रीज’ म्हणून ओळखले जाणारे नैसर्गिक खडक हे येथील प्रमुख आकर्षण आहे. लक्ष्मणपूर बीचवरील सूर्यास्ताची मोहक दृश्ये पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. अन्य लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत त्याच्या आरामशीर आणि तुलनेने कमी गर्दीमुळे येथे शांतता अनुभवता येते.
राधानगर बीच
राधानगर बीच हा भारतातील सर्वोत्तम बीच म्हणून ओळखला जातो. निळेशार पाणी आणि हिरवेगार जंगल असलेला हा वाळूचा एक प्राचीन भाग आहे. टाईम्स मॅगझिनने त्याला जगातील सातव्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्याचा किताब दिला. राधानगर बीच हे केवळ स्वराज द्वीपमधीलच नव्हे, तर अंदमान बेटांमधील अनेक आकर्षणांपैकी एक आहे. खजुराच्या झाडांनी नटलेला हा बीच पर्यटकांना शांत वातावरण देतो. राधानगर बीचचे आणखी एक आकर्षण म्हणजे नीलची कोव्ह. हे एक प्राचीन सरोवर आहे.
चिडियाटापू
चिडियाटापू हे पोर्ट ब्लेअरपासून 28 किमी अंतरावर दक्षिण अंदमान बेटाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. पोर्ट ब्लेअर येथून बससेवा उपलब्ध आहे. हे पक्षी निरीक्षण, सूर्यास्ताचे दृश्य, विहंगम निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चिडियाटापू येथील जैविक उद्यान हे आणखी एक आकर्षण आहे. वनविभागामार्फत चालविण्यात येणारे वन अतिथीगृह आहे. अभ्यागतांना विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्षीदर्शन होते.
केंद्र सरकारकडून 48 हजार कोटी
मागील सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात अंदमान आणि निकोबारला 23,000 कोटी ऊपयांचा निधी मिळाला होता. तर विद्यमान सरकारच्या गेल्या दहा वर्षांत अंदमान आणि निकोबारसाठी सुमारे 48,000 कोटी ऊपयांचा निधी देण्यात आला. मागील सरकारच्या कालखंडात 28,000 घरे जलवाहिनीद्वारे जोडण्यात आली होती, गेल्या दहा वर्षातील ही संख्या 50,000 झाली आहे. अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकाकडे आज बँक खाते आणि एक राष्ट्र एक शिधापत्रिकेची सुविधा आहे. पोर्ट ब्लेअरमधील वैद्यकीय महाविद्यालयदेखील विद्यमान सरकारनेच उभारले आहे. पूर्वी येथील इंटरनेट सुविधा केवळ उपग्रहांवर अवलंबून होती. आता सध्याच्या सरकारने समुद्राखालून शेकडो किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर टाकण्याचा पुढाकार घेतला. सुविधांच्या या विस्तारामुळे येथील पर्यटनाला गती मिळत आहे. राजेश मोंडकर सावंतवाडी
–नरेंद्र मोदी, पंतप्रधान
– राजेश मोंडकर, सावंतवाडी