‘उत्सव स्पेशल’च्या नियोजनाकडे नैर्त्रुत्य रेल्वे विभागाचे दुर्लक्ष : गणेशभक्त ताटकळत
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला तरी नैर्त्रुत्य रेल्वेने अद्याप उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रतिवर्षी बेंगळूर व मुंबई मार्गांवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव स्पेशल एक्स्प्रेस फेऱ्या सुरू केल्या जातात. परंतु, यंदा अद्यापही उत्सव स्पेशल फेरीच्या नियोजनाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मुंबई, पुणे, बेंगळूर, हैद्राबाद या शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले बेळगावकर गावी परततात. विशेषत: मुंबई व बेंगळूर या शहरांमधून बेळगावमध्ये येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मुंबईहून बेळगावला येण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन एक्स्प्रेस उपलब्ध आहेत तर बेंगळूरहून बेळगावला येण्यासाठीही रात्रीच्याच दोन एक्स्प्रेस आहेत. या सर्व एक्स्प्रेसचे आरक्षण 16 ते 19 सप्टेंबरपर्यंत फुल्ल झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त एक्स्प्रेस सोडण्याची मागणी रेल्वेप्रवाशांकडून होत आहे.
रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालकांनीही तिकीट दरात वाढ करण्यास सुरुवात केली. परिवहन मंडळाच्याही मर्यादित बसेस मुंबई व बेंगळूर मार्गांवर असल्याने नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागणार आहे. गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सचे दर वाढविले जात असल्याने सर्वसामान्यांना रेल्वेचाच प्रवास किफायतशीर ठरतो. अवघ्या चारशे रुपयांमध्ये स्लीपर क्लासमधून बेंगळूरमधून बेळगावमध्ये आरामात पोहोचता येते. ट्रॅव्हल्सच्या तुलनेत हे तिकीट अत्यंत कमी असल्याने प्रवाशांची पहिली पसंती रेल्वेला असते. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी उत्सव स्पेशल सुरू केली जाते. परंतु, या उत्सव स्पेशल एक्स्प्रेसची घोषणा त्यावेळी केली जाते, ज्यावेळी प्रवाशांनी आपल्या गावी पोहोचण्यासाठी इतर पर्यायी वाहतुकीची व्यवस्था केलेली असते. परिणामी गणेशोत्सवाच्या अवघ्या आठवडापूर्वी घोषित केल्या जाणाऱ्या या उत्सव स्पेशल एक्स्प्रेसला म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नाही. त्यामुळे लवकरात लवकर बेंगळूर व मुंबई या दोन्ही मागर्विंर बेळगावमधून उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांची संख्या सर्वाधिक
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर असल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती रेल्वेला असते. सध्या मुंबई व बेंगळूर मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे बेंगळूर-मुंबई (हमसफर एक्स्प्रेस), यशवंतपूर-बेळगाव व हुबळी-पुणे या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी नैत्य रेल्वेकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्याप या एक्स्प्रेस सुरू करण्याकडे नैत्य रेल्वेने दुर्लक्ष केले आहे.
– अरुण कुलकर्णी (रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य)









