अनेक लोक स्वत:संबंधी अनेक अनोखे आणि अविश्वसनीय दावे करतात असा आपला अनुभव आहे. यांपैकी सध्याच्या काळात सर्वात चर्चेत आणि लोकप्रिय असणारा दावा, भविष्य प्रवास किवा टाईम ट्रॅव्हलींग हा आहे. आपण ‘पुढचे’ पाहू शकतो. आजपासून अनेक वर्षांनी नेमक्या कोणत्या घटना घडणार आहेत, हे आपल्याला समजते किंवा दिसत असा हा दावा असतो. आपल्याकडे भविष्य सांगणारे तज्ञ आपली पत्रिका किंवा हात पाहून आपल्या जीवनात पुढे काय घडणार आहे, हे स्पष्ट करतात. निदान तसा त्यांचा दावा असतो.
आपल्याकडे जसा ज्योतिषांचा बोलबाला असतो, तसा पाश्चिमात्य देशांमध्ये ‘टाईम ट्रॅव्हलर्स’चा असतो. सध्या अमेरिकेत अशाच एका व्यक्तीची चलती आहे. त्याचा दावा असा आहे की तो भविष्यकाळात 648 वर्षे म्हणजेच इसवी सन 2671 पर्यंत काय होणार आहे ते जाणतो. त्याने ते पाहिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार याच वर्षाच्या, अर्थात 2023 च्या डिसेंबर महिन्यात जगाला एक मोठी शुभवार्ता मिळणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये शास्त्रज्ञांच्या हाती असे एक ‘फळ’ लागणार आहे, की ज्यामुळे माणसाचे वय वाढण्याचा वेग अतिशय कमी होणार आहे. याचाच अर्थ असा की हे फळ माणसाचे आयुक्त मोठ्या प्रमाणावर वाढविणार आहे. मात्र, हे फळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर उगविणाऱ्या कोणत्याही झाडाचे असणार नाही. तर ते शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पोटात मिळणार आहे. या फळामुळे माणसाचे आयुष्य 200 वर्षांपर्यंत वाढणार असल्याचा त्याचा दावा आहे. त्याने या फळाला एस्ट्रिम असे नावही देऊन टाकले आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार 2024 हे वर्ष अत्यंत आश्चर्यकारक असेल. या वर्षात शास्त्रज्ञांना कृत्रिम किंवा कस्टामाईज्ड बालके जन्मविण्याचे तंत्रज्ञान हाती लागणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षात इतरही अनेक आश्चर्यकारक शोध लागणार आहेत. अर्थात, संशोधकांनी त्याचे दावे खोडलेले असून सर्वसामान्यांनी अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केलेले आहे. तरीही असंख्य लोकांनी त्याच्या या भविष्याच्या वेधला खरे मानलेले असून ते डिसेंबरची प्रतीक्षा करीत आहे.









