मध्यप्रदेशमधील शिक्षिका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ः अमृतसरच्या अटारी सीमेवर अटक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणाऱया तरुणीला पंजाब पोलिसांनी अटारी सीमेवर अटक केली आहे. फिजा असे 24 वषीय तरुणीचे नाव असून ती मूळची मध्यप्रदेशातील रेवा जिल्हय़ातील आहे. या मुलीकडे पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसाही होता. मात्र, ती पाकिस्तानात जाण्यापूर्वी तिच्या नावाने लुकआऊट परिपत्रक जारी झाल्याने ती तपास यंत्रणांच्या जाळय़ात अडकली. कस्टम विभाग आणि बीएसएफच्या अधिकाऱयांनी अटारी सीमेवर तरुणीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीला परत घेण्यासाठी रेवा पोलीस अमृतसरला पोहोचले आहेत.
मध्यप्रदेशमध्ये शिक्षिका असलेल्या तरुणीला पाकिस्तानला जात असताना अमृतसरमधील जॉईंट चेकपोस्ट अटारी येथे कस्टम अधिकाऱयांनी अडविले. या मुलीच्या नावाने लुकआऊट नोटीस निघाल्याने अधिकाऱयांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीअंती पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमाच्या जाळय़ात अडकल्याने ही तरुणी कुटुंबीयांना न सांगता अटारी बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जाणार होती, असे निष्पन्न झाले आहे. बीएसएफ अधिकाऱयांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.
सोशल मीडियाद्वारे जुळले प्रेमबंध
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रेवा जिल्हय़ातील 21 वषीय तरुणी काहीकाळापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलशाद नामक एका पाकिस्तानी तरुणाच्या संपर्कात आली होती. दोघांची मैत्री झाल्यानंतर शिक्षिका म्हणून काम करणाऱया या तरुणीने पाकिस्तानी मुलाशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची योजना आखली. सर्वप्रथम तिने आपल्या कुटुंबीयांना न सांगता मार्च महिन्यात पासपोर्ट बनविला. त्यानंतरच ती पाकिस्तानात जाण्यासाठी निघाली होती.
आठवडय़ाभरापूर्वी घरातून गायब
14 जून रोजी ही तरुणी तिच्या घरातून कागदपत्रांसह अचानक गायब झाली. घरच्यांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. याचदरम्यान तिला एका पाकिस्तानी मुलाच्या जाळय़ात अडकून पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ या मुलीची माहिती पोलिसांना दिली आणि तिला पाकिस्तानात जाऊ नये म्हणून लुकआऊट कॉर्नर नोटीस जारी केली. शनिवारी अटारी सीमेवर पोहोचून कस्टम क्लिअरन्ससाठी कागदपत्रे जमा केली. कस्टम अधिकाऱयांना त्याच्या लुकआउट कॉर्नरची समस्या कळताच त्यांनी तिला बीएसएफकडे सोपविले.