पुणे / प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, आपल्याकडे तेल कंपन्यांकडून अद्यापपर्यंत दर कमी करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे भारतासह राज्यातही इंधनाचे दर कमी व्हावेत, या मागणीसाठी वाहतूकदारांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी, महागाई मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याच्या झळा मध्यमवर्गीयांसह सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांना बसत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून इंधनाच्या दर कमी करावेत, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे सदस्य बाबा शिंदे म्हणाले, इंधन हा वाहतूकदारांसाठी महत्त्वाचा घटक आहे. इंधनावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च झपाटय़ाने वाढत आहे. त्याचबरोबर इतर वस्तूंच्या दरातदेखील वाढ होत आहे. इतर सगळय़ाच वस्तूंचे दर वाढल्याने सगळय़ांचे बजेट कोलमडल्याचे पहायला मिळते. महागाईच्या या झळा कमी झाल्या, तर मात्र नक्कीच दिलासा मिळू शकतो. म्हणूनच इंधनाचे दर कमी व्हावेत, या मागणीसाठी आम्ही पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे.
पंतप्रधान दखल घेणार का?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरही तेल कंपन्यांकडून दरकपात होत असल्याचे चित्र देशात वेळोवेळी पहायला मिळत आहेत. आता वाहतूकदारांच्या संघटनेने याबाबत पुढाकार घेत पंतप्रधान मोदींना याविषयी साकडे घातले आहे. पंतप्रधान या मागणीला प्रतिसाद देणार का, पुढच्या काही दिवसांत इंधनाचे दर कमी होणार का आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.








