वाहतूक रिक्षा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केवळ प्रवासी वाहतूक करण्याचे चालकांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
ऑटोरिक्षामधून मार्केटमधील साहित्य भरुन भाडे आकारणी केली जात आहे. केवळ प्रवासी वाहतूक करण्यासाठी त्यांना परवाना दिलेला असतो. मात्र मार्केटमधील साहित्य भरुन घेवून भाडे केले जात आहे. हे बेकायदेशीर आहे. तेंव्हा प्रवासी रिक्षांमधून साहित्य वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक रिक्षा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
साहित्य वाहतूक रिक्षाचालकांनी जर प्रवासी बसवून वाहतूक केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र ऑटोरिक्षांमधून साहित्य घालून भाडे आकारणी केली जात आहे. हे योग्य आहे का? असा प्रश्नदेखील या निवेदनात केला आहे. आम्ही प्रतिवर्षी 25 हजार रुपये विमा भरतो आणि साहित्य वाहतूक करण्याचे काम करतो. त्यामधून काही रक्कमच आमच्या उदरनिर्वाहासाठी शिल्लक राहते. मात्र ऑटोरिक्षामधून साहित्याची वाहतूक होत असल्यामुळे आम्हाला काम मिळणे कठीण झाले आहे.
बेळगाव शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे स्टॅन्ड आहे. तेथून नागरिक रिक्षा नेण्यासाठी येत असतात. मात्र ऑटोरिक्षाधारक आम्ही तुमच्या साहित्याची वाहतूक करू, असे सांगून कमी पैशांमध्ये त्याची वाहतूक करत आहेत. त्याचा फटका आम्हाला बसत आहे. तेंव्हा ऑटोरिक्षामधून कोणत्याही प्रकारच्या साहित्याची वाहतूक होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
प्रवासी वाहतूक आणि साहित्याची वाहतूक करण्यासाठी आरटीओने काही नियमावली घातली आहे. मात्र त्या नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच आरटीओंनी देखील लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. साहित्याची वाहतूक करताना आम्ही स्वत:हूनच हमाली काम देखील करत आहे. आम्ही कष्ट खात आहे. मात्र आम्हाला कामच नाही. तेंव्हा त्याचा कोठेतरी गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश अजनकट्टी, जिल्हा कार्यदर्शी राजशेखर होसमनी, कार्याध्यक्ष विनय हिरेमठ, शिवानंद सैबन्नावर, अमित लोणी, प्रकाश सायनेकर, संतोष खोत यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमानुसार कारवाई करा…

साहित्य वाहतूक करणाऱ्या रिक्षांमधून जर प्रवासी वाहतूक केली तर कारवाई केली जाते. मग प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमधून साहित्याची वाहतूक होत असेल तर त्यावर का कारवाई केली जात नाही? तेंव्हा आरटीओंनी तातडीने अशा रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्याध्यक्ष सुरेश अजनकट्टी यांनी केली.
काम नसल्याने समस्या…

गेल्या काही वर्षांमध्ये रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कामे कमी येत आहेत. दिवसाकाठी एक-दोन भाडी वगळता काहीच उत्पन्न नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा आम्हाला काम मिळण्यासाठी नियमांचे पालन करावे, अशी मागणी संतोष खोत यांनी केली.
कर्ज काढून व्यवसाय करणे अशक्य…

रिक्षा घेण्यासाठी कर्ज काढावे लागते. त्यामुळे महिन्याला हप्ते भरावे लागतात. मात्र काम नसल्यामुळे ते हप्ते देखील भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे साहित्याची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर संकट कोसळले आहे. तेंव्हा ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक प्रकाश सायनेकर यांनी केली.









