क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातोय : ट्रॅक्टर कलंडण्याचे प्रकार
बेळगाव : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध मार्गांवर ऊस वाहतूक वाढली आहे. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारी वाहने कलंडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. अशा वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. साखर कारखान्यांची चिमणी पेटली की विविध मार्गांवर उसाची वाहतूक सुरू होते. मात्र क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहनामध्ये भरला जात असल्याने ही वाहने धोकादायक ठरू लागली आहेत. राष्ट्रीय महामार्ग, बेळगाव-हंदिगनूर, बेळगाव-खानापूर, बेळगाव-वेंगुर्ला, बेळगाव-राकसकोप आदी मार्गांवर उसाची धोकादायक वाहने धावू लागली आहेत. विशेषत: टॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जात आहे. त्यामुळे चढतीला समोरची दोन्ही चाके उचलू लागली आहेत. त्यामुळे इतर वाहनांना त्याचा धोका पोहोचू लागला आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत.
या रस्त्यावरून डबल ट्रॉलीची ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी ऊस वाहने कलंडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे इतर वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे.ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर आणि ट्रक गावाशेजारी आणि शाळेशेजारी थांबवल्या जात आहेत. दरम्यान मुले ऊस खाण्यासाठी वाहनांवर लोंबकळत आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागला आहे. ही अवजड वाहने गावाजवळ थांबू नयेत, अशी मागणीही होऊ लागली आहे. एकाचवेळी दोन ट्रॉलींची वाहतूक सुरू असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. रात्रीच्यावेळी ही वाहतूक त्रासदायक ठरू लागली आहे. दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे आहे. मात्र रिफ्लेक्टरविना ऊस वाहतूक होऊ लागली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे धोकादायक ऊस वाहतुकीला पोलीस प्रशासन शिस्त लावणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.









