प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अनेकवेळा कामबंद आंदोलन केले आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहन कर्मचारी 5 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असून सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण कामबंद ठेवण्यात येणार असून विविध संघटनांनीही आपल्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती सी. एस. बिडनाळ यांनी दिली. कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या विविध मागण्या असून प्रमुख तीन मागण्या आहेत. जानेवारी 2020 पासून 38 महिन्यांपासून असलेली थकबाकी देण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2023 च्या मूळ वेतनात 31 टक्के महागाई भत्ता व 1 जानेवारी 2024 पासून 25 टक्के वेतनवाढ देण्यात यावी. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीशी चर्चा करून परिवहन महामंडळांच्या व्यवस्थापन पातळीवर तोडगा काढण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
शक्ती योजनेंतर्गत आतापर्यंत 500 कोटी मोफत तिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना यशस्वी झाल्यानिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र ही योजना यशस्वी होण्यामागे परिवहन कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. राज्य सरकारने अनेक कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांची दूरच्या ठिकाणी रवानगी केली आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फ किंवा निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मागे घेऊन सदर कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने याआधीच एस्मा लावला असला तरी आम्ही संपावर जाणार आहोत. राज्य सरकार नागरिकांना होणाऱ्या समस्यांचे कारण देत संप न करण्याची विनंती केली आहे. पण नागरिकांनीही या संपाला पाठिंबा द्यावा. परिवहन कर्मचारी अनेक वर्षांपासून संपाच्या माध्यमातून मागण्या करत आहेत. मात्र दरवेळी राज्य सरकारकडून याची दखल घेण्यात येत नाही. मात्र आता कोणत्याही कारवाईला दाद देणार नसून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद ठेवणार आहे. आपल्या संपाला विविध संघटनांही पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश यर•ाr, राजू पन्यागोळ, गिरीश कांबळे, अॅड. नागेश सातेरी, उमेश सिदनाळ यांच्यासह परिवहन कर्मचारी उपस्थित होते.









