नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखो प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करत कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने 31 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाची हाक पाहता नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखो प्रवाशांचे हाल होण्याची शक्मयता आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बेंगळूर महानगर परिवहन महामंडळ, कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ आणि वायव्य रस्ते परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. 36 महिन्यांची थकबाकी 1,750 कोटी ऊपये देण्यात यावी. मूळ वेतनात 25 टक्के वेतन आणि 31 टक्के महागाई भत्ता एकत्र करून वेतनश्रेणी तयार करावी. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करावी. याचबरोबर प्रतिमहिना 2 हजार ऊ. वैद्यकीय उपचाराचा खर्च द्यावा, अशी मागणी केली आहे.
बसस्थानक आणि बस युनिटमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी. शक्ती योजनेमुळे होणाऱ्या शिक्षेचा आणि छळाचा प्रश्न सोडवावा. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी कार्यवाही करावी. अतिरिक्त कामाबद्दल ओव्हर टाईम देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आमची विनंती मान्य करून मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.









