केवळ 12 हजार विद्यार्थ्यांनीच काढला बसपास : बसपासच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम
बेळगाव : शक्ती योजनेमुळे पासधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आतापर्यंत केवळ 12 हजार 716 विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले आहेत. दरवर्षी बेळगाव विभागात 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बस पास घेत होते. त्या तुलनेत यंदा बस पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे परिवहनला बसपासच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. विद्यार्थिनींचा प्रवास शक्ती योजनेंतर्गत मोफत सुरू आहे. त्यामुळे बस पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्राथमिक, माध्यमिक आणि पीयूसी विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले होते. सध्या पदवी आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जात आहेत. दोन वर्षांत बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर बसपास उपलब्ध होऊ लागले आहेत. ही प्रक्रिया थोडी किचकट असल्याने विद्यार्थी बसपास मिळविण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे.
परिवहनच्या समस्येत वाढ
परिवहनला दरवर्षी बसपासच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, यंदा बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 12 हजारांवर आली आहे. त्यामुळे महसूलही घटला आहे. विशेषत: परिवहनला पहिल्या टप्प्यातच कोट्यावधीचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे नवीन बस खरेदी आणि परिवहनच्या समस्या मार्गी लागत होत्या. मात्र, यंदा शक्ती योजनेमुळे विद्यार्थिनींनी बसपास काढले नाहीत. केवळ विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले आहेत. त्यामुळे महसूलही काही लाखांतच जमा झाला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या उत्पन्नाला परिवहनला मुकावे लागले आहे.
परिणाम शक्ती योजनेचा
यंदा शक्ती योजनेमुळे फक्त मुलांनी बस पास मिळविले आहेत. मुलांना मोफत बस प्रवासाची सुविधा असल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटून बस पासच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. विद्यार्थी मात्र परिवहन बसनेच प्रवास करीत आहेत.
– ए. वाय. शिरगुप्पीकर,डेपो मॅनेजर









