कौटुंबिक वादातून संपविले जीवन : वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता
बेळगाव : बेळगावात परिवहन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढत्या आहेत. 20 दिवसांपूर्वी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी एका बसचालकाने बसमध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भालचंद्र शिवाप्पा तुक्कोजी (वय 45) मूळचा रा. अवरादी, ता. रामदुर्ग, सध्या रा. गांधीनगर असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या डेपोमध्ये उभ्या करण्यात आलेल्या बसमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भालचंद्रची आई यल्लव्वा तुक्कोजी (वय 76) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याची पत्नी शिल्पा तुक्कोजी व सासू शकुंतला ऊर्फ शेखव्वा यांच्यावर मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवला. भाचीच्या लग्नाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटी दिली नाही म्हणून भालचंद्रने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते.
मात्र, कौटुंबिक वादातून दिलेल्या त्रासामुळे भालचंद्रने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगत त्याच्या आईने भालचंद्रच्या पत्नी व सासूविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पत्नी व सासूने केलेल्या मानसिक छळामुळे त्याने आत्महत्या केल्याचे आईने सांगितले. शनिवार दि. 9 मार्च रोजी परिवहन मंडळाच्या पहिल्या डेपोमध्ये थांबलेल्या बसमध्ये केशव तिप्पण्णा कमडोळी (वय 57) रा. दीपक गल्ली, जुने गांधीनगर या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पाठदुखीच्या आजाराने तो त्रस्त होता. त्यामुळे मेकॅनिकल कामालाच कंटाळला होता. यापूर्वीही त्याने दोनवेळा आत्महत्येचे प्रयत्न केले होते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झाला नाही तोच आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.









