जुन्या बसेसचा प्रश्न ऐरणीवर, प्रवासी असुरक्षित
बेळगाव : पाटा तुटल्याने नावगे बस रस्त्याशेजारी असलेल्या झाडाझुडपात घुसली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, परिवहनच्या जुन्या आणि नादुरुस्त बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातत्याने परिवहनच्या बसेस प्रवासादरम्यान बंद पडणे, ब्रेक फेल होणे आणि इतर तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे परिवहन बस प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा अधिक आहे. दरम्यान, अशा बसेस विविध मार्गांवर सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान अपघात घडू लागले आहेत. सहा महिन्यांपूर्वी बेळगाव-तीर्थकुंडये मार्गावर हेडलाईट नसलेली बस धावत होती. त्यानंतर आता पुन्हा नादुरुस्त बस नावगे मार्गावर रस्त्याशेजारी झाडाझुडपात घुसल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिवहनच्या जुन्या व आयुर्मान संपलेल्या बसबाबत संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने बसमध्ये अधिक प्रवासी नसल्याने धोका टळला आहे. मात्र, सातत्याने परिवहनच्या जुन्या बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रस्त्यात टायर फुटणे, रस्त्यातच बंद पडणे, हेडलाईट बंद पडणे, धूर सोडणे असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे परिवहनचा प्रवास असुरक्षित वाटू लागला आहे.









