संजय खूळ, इचलकरंजी
महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महिलांच्या वस्तीगृहाच्या धरतीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले तृतीयपंथीयांसाठी वस्तीग्रह इचलकरंजी येथे होणार आहे. तृतीयपंथी कल्याण व हक्काचे संरक्षण अंतर्गत जिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यामुळे आता अनेक वंचित तृतीयपंथीयांना हक्काचे निवारा केंद्र उपलब्ध होणार आहे.
अर्थसंकल्पात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी तरतूद करणारी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी नगरपालिकेने मान मिळवला आहे. गेले काही वर्षे नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 25 लाखाची तरतूद करण्यात येत आहे. यावर्षीच्या या रकमेतून व प्रस्तावानंतर लागणाऱ्या ज्यादा निधीची रक्कम जिल्हा नियोजन च्या माध्यमातून उपलब्ध करून आता इचलकरंजी नगरपालिकेच्या पुढाकाराने हे वसतिगृह साकारणार आहे.
तृतीयपंथीयांना आता सन्मानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे आणण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. या अंतर्गत त्यांना अनेक सोयी सुविधा देण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सह अन्य सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन गेले काही वर्षे अत्यंत संवेदनशीलपणे काम करत आहे. विशेषता समाज कल्याण खात्यामार्फत अशा तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यासाठी घरोघरी जाऊन सुविधा देण्यात येत आहे.
तृतीयपंथीय
तक्रार निवारण समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावर, समाज कल्याण खात्याची सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांचे प्रतिनिधी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तृतीयपंथी कल्याण मंडळ राज्यस्तरावर असलेल्या समितीच्या सदस्या ॲड दिलशाद मुजावर यांनी याबाबतचा विषय या बैठकीत पुढे आणला. इचलकरंजी महापालिकेमध्ये तृतीयपंथीयसाठी 25 लाख इतकी आरक्षित असून पोर्टलवर नोंद असलेल्याना त्याचा लाभ देण्याची मागणी केली. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महिला वस्तीग्रहाच्या धरतीवर जिल्ह्यातील तृतीयपंथियसाठी वस्तीग्रह बांधकाम बाबत यावेळी चर्चा झाली. महापालिकेकडे असलेले पंचवीस लाख रुपये व उर्वरित निधी जिल्हा नियोजन विभागातून उपलब्ध करून जिल्ह्यातील पहिले वस्तीग्रह इचलकरंजीत बांधण्याचा निर्णय झाला. यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त व ॲड दिलशाद मुजावर यांनी तृतीयपंथीयांशी चर्चा करून याबाबतची पुढील कार्यवाही करावी असे या बैठकीत ठरले.
हक्काचे ठिकाण मिळणार
तृतीयपंथीयाना अनेक वेळा त्यांच्या कुटुंबीयांकडूनच बाहेर काढले जाते अशावेळी अनेकांचे मोठे हाल होतात. तसेच त्यांची अनेक मुले यांना हक्काचे ठिकाण नसल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडेही वळतात.जिल्हाधिकारी राहुल रेखावर व समाज कल्याण खात्याचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या प्रयत्नामुळे आता त्यांच्यासाठी वस्तीग्रह बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
ॲड दिलशाद मुजावर,सदस्य,तृतीयपंथीय कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन









