वेळीच वीज खंडित केल्याने अनर्थ टळला
बेळगाव : शहापूर येथील शिवारातील ट्रान्स्फॉर्मर कोसळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. ट्रान्स्फॉर्मर कोसळला, त्यावेळी सुदैवाने शेतामध्ये कोणी नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सदर ट्रान्स्फॉर्मर कोसळल्याचे शेतकऱ्यांनी हेस्कॉमला कळवताच वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ट्रान्स्फॉर्मर तसेच विद्युत खांब बसवताना योग्य तऱ्हेने बसविण्यात आले नसल्याने अवघ्या एक-दोन वर्षातच विद्युत खांब कोसळत आहेत. मंगळवारी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये चार दिवसांपूर्वी मोठा स्फोट झाला. स्फोटामधून ऑईल जमिनीवर पडले होते. यावेळीही हेस्कॉम कर्मचाऱ्यांना कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला.
कायमस्वरुपी तोडगा काढा
सध्या पावसाची अनियमितता असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार पाणी देण्यासाठी विजेची गरज लागते. परंतु, कोसळलेले विद्युत खांब, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.









