त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ओमनगर खासबाग येथील ट्रान्स्फॉर्मर कोसळण्याच्या स्थितीत आहे. शनिवारी झालेल्या तुफान पावसामुळे ट्रान्स्फॉर्मरच्या बाजूची माती वाहून गेल्याने ट्रान्स्फॉर्मर केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या ट्रान्स्फॉर्मरची वेळीच दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
शनिवारी झालेल्या पावसामुळे खासबाग येथील ओमनगर, टीचर्स कॉलनी, श्रुंगेरी कॉलनी या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. सखल भागात असणाऱया घरांमध्येही पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने मिळेल तेथून पाणी वाहू लागले. ओमनगर परिसरात गटारींचे बांधकाम केले जात असून पाण्याच्या प्रवाहाने ट्रान्स्फॉर्मरनजीकची माती वाहून गेली आहे. यामुळे हा ट्रान्स्फॉर्मर धोकादायक ठरला आहे.
ट्रान्स्फॉर्मर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. वेळीच धोका ओळखून हेस्कॉमने ट्रान्स्फॉर्मर खाली काँक्रीट घालावे व हा ट्रान्स्फॉर्मर मजबूत करणे आवश्यक आहे.









